इचलकरंजी : शहरात नशिल्या इंजेक्शनचा विळखा घट्ट होत चालला आहे. संशयावरून ताब्यात घेतलेल्या समर्थ दत्तात्रय चौगुले (वय 19, रा. विवेकानंदनगर, कोरोची) या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकाने मेफेन्टरमाईन सल्फेट या नशिल्या इंजेक्शनच्या तब्बल 100 बाटल्यांचा साठा केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी त्याला अटक करून मोटारसायकल व मोबाईलसह एकूण 63 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पंचगंगा नदी परिसरात करण्यात आली. या प्रकरणी कॉन्स्टेबल अमर शिरढोणे यांनी फिर्याद दिली आहे. ही माहिती पो.नि. महेश चव्हाण यांनी दिली.
समर्थ चौगुले आयटीआयमध्ये शिक्षण घेतो. मोटारसायकलवरून जाताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता बॉक्समध्ये नशिल्या इंजेक्शनचा साठा आढळून आला. स्वतःच्या वापरासाठी तसेच विक्रीच्या उद्देशाने त्याने नशिल्या इंजेक्शनचा साठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चौगुले यास न्यायालयासमोर हजर केले असता 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
इंजेक्शनची ऑनलाईन खरेदी
चार दिवसांपूर्वीच यड्राव येथील साहिल पाटीलकडून मेफेन्टरमाईन सल्फेट टर्मिनल व मेफेन्टरमाईन सल्फेट वोफेन या नशिल्या इंजेक्शनच्या 67 बाटल्या जप्त केल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच पुन्हा ही कारवाई झाल्याने शहरात नशिल्या इंजेक्शनचे जाळे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौगुले याने ही इंजेक्शन ऑनलाईन मागवल्याचेही उघड झाले आहे.