कोल्हापूर : दारूच्या नशेत घरात वारंवार धिंगाणा करणाऱ्या लहान भावाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. मंगळवारी (दि. ४) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजेंद्रनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी महेंद्र प्रताप शिवशरण (वय २६, रा. राजेंद्रनगर) याला बुधवारी (दि. ५) अटक केली. तर मिलिंद प्रताप शिवशरण (वय २१, रा. आराम कॉर्नर, राजेंद्रनगर) असे मृताचे नाव आहे.
राजेंद्रनगर येथे शिवशरण कटुंब राहते. मिलिंद शिवशरण हा रिक्षाचालक असून, संशयित महेंद्र मोलमजुरीचे काम करतो. मिलिंदला दारूचे व्यसन आहे. तो दररोज घरात मद्यप्राशन करून धिंगाणा घालतो. मंगळवारी रात्रीही मिलिंद दारूच्या नशेत घरी येऊन मोठ्याने बडबड करू लागल्याने दोघांमध्ये घराच्या दारातच वादावादी सुरू झाली. वडिलांनी मध्यस्थी करून वाद थांबविला. मात्र, पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. महेंद्रने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत मिलिंद गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेतच एका खोलीत झोपविले. सकाळी उठल्यानंतर तो मयत झाल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.
मारहाणीत मिलिंदचा मृत्यू झाल्याचे महेंद्रच्या निदर्शनास आल्याने घाईगडबडीत अंत्यसंस्कार उरकून खून पचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदनादरम्यान पोलिसांना संशय आल्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक रूपेश इंगळे, संजय कोळी, तानाजी चौगुले, नितीश बागडी, दिलीप पाटील यांनी घटनास्थळावरून माहिती घेतली. आपला बनाव लक्षात येणार या शक्यतेने महेंद्रने ११२ नंबरला फोन करून खुनाची माहिती दिली. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल बागल अधिक तपास करीत आहेत.
चारच दिवसांपूर्वी रिक्षा उलटली
चार दिवसांपूर्वी मिलिंदच्या रिक्षाचा अपघात झाला होता. यामध्ये तो जखमी असूनही दारू पिऊन दंगा सुरूच होता. या अपघातामध्ये मिलिंद गंभीर जखमी झाला होता. त्याच्या अंगभर जखमा झाल्या होत्या.