file photo  
कोल्हापूर

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एकतर्फी प्रेमातून बारावीच्या वर्गात शिकणार्‍या कॉलेज तरुणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिल्याची घटना कदमवाडी भोसले पार्क परिसरात घडली. याप्रकरणी मुख्य संशयित सोहेल व साथीदार निजामविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीपर्यंत पोलिसांना संशयितांचा छडा लागला नव्हता.

पीडित तरुणी अल्पवयीन आहे. संशयित व पीडिता दोघेही 2019 मध्ये एकाच शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होते. ओळखीचा गैरफायदा घेत संशयित सोहेल (नाव व पत्ता अपूर्ण आहे) काही दिवसापासून तिचा पाठलाग करून मोबाईलवर सातत्याने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र तिने त्याला स्पष्ट नकार दिला होता.

काही दिवसांपूर्वी संशयिताने पीडित तरुणीच्या मैत्रिणींशी सपर्क साधला. पीडितेला आपल्याशी प्रेमसंबंध ठेवण्याचा निरोपही देण्याचा त्याने प्रयत्न केला. शुक्रवारी (दि. 6) रात्री साडेआठ वाजता त्याने साथीदार निजाम याला घरी पाठवून दिले. घरासमोरील रस्त्यावर उभा राहून निजामने तिचे नाव घेत मोठ्या आवाजात हाका मारल्या. आवाजामुळे तरुणीसह तिचे वडील घरातून बाहेर येताच अन्य दोन सहकार्‍यांसमवेत निजामने पलायन केले.

या घटनेनंतर शनिवारी (दि. 7) सकाळी 10.45 वाजता कॉलेज सुटल्यानंतर पीडितेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. आपण सोहेल बोलतो, असे सांगून त्याने आठवीच्या वर्गात असल्यापासून तुझ्यावर प्रेम करतोय. मला नकार दिल्याने तुला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. मी तुझा तिरस्कार करीत आहे. तू मला परत दिसलीस तर तुझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करेन. हा प्रकार वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही गाडीवरून उचलून आणेन, अशी संशयिताने धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेमुळे भेदरलेल्या तरुणीने घराकडे धाव घेतली. पालकांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. कुटुंबीयांसह नातेवाईकांनी शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी संशयितांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

कृत्याची गंभीर दखल

अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी नराधमाच्या कृत्याची गंभीर दखल घेतली आहे. शाहूपुरीचे निरीक्षक सिंदकर यांनी संशयितांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत. लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT