Youth cheats woman | पुण्यातील युवतीला तरुणाने फसविले! 
कोल्हापूर

Youth cheats woman | पुण्यातील युवतीला तरुणाने फसविले!

कसबा बावड्यातील तरुणांच्या माणुसकीमुळे युवती सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : कसबा बावड्यात मंगळवार, दि. 30 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पाटील गल्लीतील एका बाकड्यावर 19 वर्षांची युवती रडत बसलेली दिसली. ही बाब टिपू मुजावर यांच्या लक्षात येताच त्यांनी मित्र ओंकार पाटील यांना माहिती दिली. पाटील व त्यांच्या मित्रांनी येऊन तिची विचारपूस करून धीर देत पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर तिला कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.

युवतीशी संवाद साधला असता, तिने सांगितले की, सोशल मीडियावरील तिच्या मित्राने चुकीचा पत्ता देत कोल्हापुरात येण्यास सांगितले. कसबा बावडा येथे मामा राहत असल्याने तिथे येण्यास सांगण्यात आले; मात्र तो तरुण तिला भेटायला आलाच नाही. संबंधित युवती चार दिवसांपूर्वी पुण्याहून पळून आली होती. तिच्याकडे ना मोबाईल होता, ना पैसे. मित्राने दिलेल्या खोट्या माहितीमुळे ती पूर्णतः फसवली गेली होती. तीन दिवस तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी येण्यास सांगत होता. मंगळवारी त्याने कसबा बावड्यात येण्यास सांगितले; पण तो आलाच नसल्याने ती अखेर रडत थांबली. युवती रडत असल्याचे दिसल्याने तरुणांनी तिची विचारपूस केली. तिच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधला. पुण्यात तिच्या आईने आधीच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तिला आपली मुलगी कसबा बावडा येथे सुरक्षित असल्याचे सांगताच त्यांनी मुलीला आपल्याकडे ठेवण्याची विनंती केली. मुलगी सापडल्याचे कळताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. मदत करणार्‍या तरुणांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, पुणे पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक शिवराज खराडे यांनी तरुणांशी संपर्क साधून त्या युवतीला शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर करण्याची विनंती केली. तरुणांनी तिला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला धीर देऊन समुपदेशन केले आणि नातेवाईकांकडे सोपविले.

सोशल मीडियावरील मैत्री ठरली फसवी

सोशल मीडियाची मैत्री कशी धोकादायक आणि फसवी असू शकते, याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. एकटी युवती पाहून एखाद्याने तिचा गैरफायदा घेतला असता तर अघटित घडले असते. सुदैवाने ती युवती कसबा बावड्यात पोहोचली आणि तिला तेथील तरुणांनी केवळ मदतच केली नाही तर तिला तिच्या घरी सुखरूप पोहोचण्यासाठी मदतही केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT