पेठवडगाव : शेअर मार्केटमधील आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून भादोले (ता. हातकणंगले) येथील सूरज रामचंद्र पाटील (वय ३२) या तरुणाचे चाकूचा धाक दाखवून चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची घटना पेठवडगाव येथे घडली. खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याची फिर्याद सूरज यांचे भाऊ धिरजकुमार पाटील (वय ३०) यांनी वडगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सूरज पाटील हे शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करतात. या व्यवसायात त्यांना तोटा झाल्याने अनेकांचे पैसे देणे बाकी होते. शनिवारी (दि. १७) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास ते पेठवडगाव येथील नगरपालिका चौकात आले होते. यावेळी रवि थोरवडे (रा. कोल्हापूर) याने शेअर मार्केटमधील आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून त्यांना जबरदस्तीने काळ्या रंगाच्या चारचाकीतून गळ्याला चाकू लावून खुनाच्या उद्देशाने पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संशयित रवि थोरवडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका खाडे करीत आहेत.