माद्याळ : ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने कासारी (ता. कागल) येथील तरुणाचा मृत्यू झाला. मिथुन पंडित राठोड (वय 30, मूळ गाव विजापूर, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. गारगोटी - गडहिंग्लज मुख्य मार्गावर पांगिरे नागोबाचे (ता. भुदरगड) येथे शनिवारी (दि. 11) सायंकाळी हा अपघात झाला.
मिथुन राठोड मांगनूर (ता. कागल) येथून काम संपवून दुचाकीवरून गावाकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला मांगनूर येथील नारायण पाटील यांच्या ट्रॅक्टरची धडक बसली. या अपघातात ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे.
दरम्यान, अपघातानंतर फरार झालेले ट्रॅक्टर मालक नारायण पाटील याला पोलिस व कासारी, हसूर खुर्द, पांगिरे गावच्या युवकांनी राणेवाडी रस्त्यावर शोधून काढले. पोलिसांनी ट्रॅक्टरसह पाटील याला ताब्यात घेतले आहे. मिथुन यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. राठोड कुटुंबीय 20 वर्षांपूर्वी कामानिमित्त कासारी गावात स्थायिक झाले. शेती, पाणी योजनेचे नळ गळती काढणे, मोलमजुरी अशी कामे ते करतात. पंडित यांच्या एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.