Farm labourer electrocuted
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड येथे एका तरुण शेतमजुराचा विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेश विठ्ठल रजपूत (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, शेतात काम करत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास जुने दानवाड-टाकळीवाडी रस्त्यालगत असलेल्या एका उसाच्या शेतात घडली. सुरेश रजपूत हे शेतामध्ये ऊसाला खत (युरिया) घालत होते. त्याचवेळी, शेतातून गेलेल्या विद्युत पोलाच्या अर्थिंग वायरचा त्यांना तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. हा धक्का इतका जोरदार होता की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर शेजारील शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांनी आणि ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलीस प्रशासन आणि महावितरण कंपनीला घटनेची माहिती दिली. या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. सुरेश यांच्या अकाली निधनाने रजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कुरुंदवाड येथील प्राथमिक रुग्णालयात करण्यात येत आहे.