कोल्हापूर : इअर एंडिंग आणि नाताळच्या सुट्टीमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. न्यू पॅलेस परिसरात शालेय सहलीचे टिपलेले छायाचित्र.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

kolhapur | इअर एंडिंगच्या पर्यटनाने कोल्हापूर बहरले...

थर्टी फर्स्ट अन् नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक एकवटले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : इअर एंडिंगच्या पर्यटनाने कोल्हापूर बहरले आहे. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. नाताळ सणातील सलग सुट्ट्यांचा पुरेपूर उपयोग करत पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

करवीर काशी, छत्रपतींची राजधानी, राजर्षी शाहूंची पुरोगामी नगरी, कला-क्रीडानगरी अशा विविधतेने नटलेले कोल्हापूर हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. यामुळे पर्यटन क्षेत्रात कोल्हापूरला कायम प्राथमिकता दिली जाते. बर्फ आणि समुद्र सोडला, तर विविधतेने नटलेले कोल्हापूर पर्यटनासाठी पुरेपूर आहे. अंबाबाई मंदिर, जोतिबा देवालय यासह विविध धार्मिक स्थळे, पंचगंगा नदी घाट, ऐतिहासिक रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, जुना राजवाडा, टाऊन हॉल उद्यान, विविध गडकोट-किल्ले, राधानगरी व दाजीपूर अभयारण्य, मसाई पठार, धरणे, तलाव अशी विविधता कोल्हापूर जिल्ह्यात एकवटली आहे.

यामुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यांतून कोल्हापूरला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. ख्रिसमस सणाची सुट्टी 25 डिसेंबरपासून सुरू झाल्याने पुढील आठवडाभराचे नियोजन करून देशभरातील पर्यटक मोठ्या संख्येने कोल्हापूर दर्शनासाठी आले आहेत. यामुळे पर्यटकांच्या गर्दीने कोल्हापूर अक्षरश: पॅक झाले आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सहलीही मोठ्या संख्येने आल्या आहेत. पर्यटकांच्या वाहनांनी शहरातील प्रमुख मार्गांच्या दुतर्फा गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, जुना राजवाडा, राजर्षी शाहू जन्मस्थळ व समाधी स्थळ, जोतिबा मंदिर, कणेरीमठ यासह शहर आणि जिल्ह्यातील बहुतांशी पर्यटनस्थळे बहरली आहेत.

चमचमीत खाद्यपदार्थांना मागणी

पर्यटकांकडून कोल्हापूरची खासियत असणार्‍या चमचमीत खाद्य पदार्थांना मोठी मागणी आहे. यामुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाऊ गल्ल्यांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तांबडा-पांढरा रस्सा, मटण-भाकरी, खिमा-पराठा, मिसळ, बिर्याणी अशा खाद्य पदार्थांवर आवर्जुन ताव मारला जात आहे. तसेच, कोल्हापुरी चप्पल, फेटा, साज, गूळ, मसाले, घोंगडे या पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT