यड्राव : डंपरची मोटरसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार सतीश विठ्ठल शिंदे (वय ३६, रा. नांदणी, ता. शिरोळ) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालक दशरथ लक्ष्मण व्हनमोरे (४८, रा. सांगलवाडी, ता. मिरज) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास यड्राव फाट्याजवळ घडली. घटनेची वर्दी अजित भाऊसो सूर्यवंशी (४५, रा. रामनगर, नांदणी) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
सतीश मोटारसायकल (क्र. एम.एच.५१ ७२२४) वरून आरटीओ कार्यालय शहापूर येथे चार चाकीचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी जात होता. यड्राव फाट्याजवळ डंपर (क्र. एम.एच. १० सीआर ९४९५) वरील चालक दशरथ व्हनमोरे याने भरधाव वेगाने सतीश याच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये सतीश रस्त्यावर पडला आणि त्याच्या डोक्यावरून डंपरचे पुढील व मागचे चाक गेले. सतीश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. अंगावर शहारे आणणार्या घटनेमुळे वाहनधारकांतून हळहळ व्यक्त होत होती. सतीशच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. घटनेनंतर डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.