सांगली : जागतिक बँक निधीतून सांगली व कोल्हापूरचे पूरनियंत्रण केले जाणार आहे. सांगलीत पाचशे कोटी रुपयांची कामे लवकरच सुरू होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगलीत सांगितले. सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्नही सोडविला जाईल, असेही ते म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत आले होते, यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली की सांगली, कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण होतो. घरे, शेती पाण्याखाली जातात. शासकीय मालमत्तेबरोबरच जनतेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे जागतिक बँकेच्या मदतीने पूरनियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवले जाणार आहे.
जागतिक बँक निधीतून नदीपात्र सुधारणा, बंधारे, संरक्षक भिंती, ड्रेनेज व्यवस्था, तसेच पाऊस व पुराच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. सांगलीत पूरनियंत्रणाची 500 कोटी रुपयांची कामे लवकरच सुरू होतील. सांगली व कोल्हापूरमध्ये पूरनियंत्रण कामे झाल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा विकास सुरक्षित आणि शाश्वत करण्याच्या द़ृष्टीने हा पूरनियंत्रण प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यात आले.