कोल्हापूर : विनासायास अवैध मार्गाने कमाई करून झटपट श्रीमंतीची स्वप्ने पाहणार्या गुन्हेगारी प्रवृतीच्या म्होरक्यांसह तरण्या पोरांच्या डोक्यात ‘विपरीत बुद्धी’चे खूळ घोंगावू लागले आहे. आर्थिक उलाढाल असलेल्या फर्ममध्ये मजुरी करणार्या ‘पंटर’वर भुरळ टाकून त्याच्याकडून उलाढालीची माहिती काढून संबंधित व्यावसायिक फर्ममधील तिजोरीवर ‘डाका’ घालण्याचा नवा फंडा जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात सुरू झाला आहे. सम्राटनगर आणि गांधीनगर येथील जबरी चोरीच्या कारनाम्यांमुळे मालक आणि कामगार यांच्यातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सम्राटनगर येथील उद्योजक राजीव पाटील यांच्या बंगल्यावर गुरुवारी (दि. 12) भरदिवसा जबरी चोरी झाली. राजारामपुरी येथील उच्चभ—ू वसाहतीत चोरट्यांनी बंगल्यात चाकूचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड व तीन डिजिटल लॉकर पळवून नेले. हेल्मेटधारी आणि रेनकोट परिधान केलेल्या चोरट्यांनी भरदिवसा थरार माजवल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
सम्राटनगर येथील घटनेनंतर शुक्रवारी (दि. 13) मध्यरात्री गांधीनगर येथील व्यापारी प्रकाश वाधवाणी यांच्या कंपाऊंडमध्ये पार्किंग केलेल्या टेम्पोची काच फोडून चोरट्यांनी 1 कोटी 90 लाखांची रोकड लुटली. दोन्हीही घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह अडीच कोटींच्या ऐवजावर डल्ला मारला. एकापाठोपाठ घटना घडल्याने साहजिकच पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषणने दोन्हीही घटनांमधील ‘पंटर’ शोधून काढून सराईतांना बेड्या ठोकल्या.
उद्योजक राजीव पाटील यांच्याकडे पाच-सहा वर्षांपासून चालक म्हणून काम करणार्या आणि कर्जबाजारी झालेल्या प्रकाश दत्तात्रय चौगुले (रा. हंचनाळ) याने साथीदाराच्या मदतीने 44 तोळे दागिन्यांसह 50 लाखांचा ऐवज लुटल्याचे उघड झाले; तर गांधीनगर येथील घटनेत व्यापारी प्रकाश वाधवाणी यांच्याकडील फर्ममध्ये काम करणार्या स्वरूप संजय शेळके (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याने बेळगाव येथील व्यापारी कैलास गोरड यांच्या आर्थिक उलाढालीची म्होरक्या योगेश पडळकर (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याला टीप देऊन साथीदाराच्या मदतीने मध्यरात्री टेम्पोतील 1 कोटी 90 लाखांची रोकड लुटली. पथकाने दोन्हीही घटनांमधील कामगारांच्या कारनाम्याचा पर्दाफाश करीत दागिने, रोकडसह 2 कोटी 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
औद्योगिक वसाहत असो अथवा शहरासह जिल्ह्यातील शेकडो व्यावसायिक फर्ममध्ये हजारो कामगार 40-45 वर्षांपासून प्रामाणिकपणे इमानेइतबारे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही अवसानघातकी आणि श्रीमंतीची स्वप्ने रंगवून थेट मालकाच्या तिजोरीवर डाका टाकून लूटमार करणार्या ‘पंटर’च्या कारनाम्यांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती आहे. अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी वेळीच खबरदारीची आवश्यकता आहे.