यड्राव : औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डोक्यात लोखंडी साहित्य पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी याबाबत रुग्णालयात किंवा पोलिसांत कोणतीही नोंद न करता परस्पर कर्नाटकात नेऊन अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे हा अपघात नसून, खून असल्याची चर्चा सुरू आहे.
बुधवारी घडलेल्या या घटनेत मुसळधार पावसामुळे बांधकाम सुरू असलेल्या कारखान्यातील लोखंडी कैची पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्याला उपचारांसाठी इचलकरंजीतील एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र, या मृत्यूची रुग्णालयात नोंद करण्यात आली नाही. ही संपूर्ण घटना इतक्या गुप्तपणे का हाताळण्यात आली, रुग्णालयात आणि पोलिस ठाण्यात नोंद का टाळली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात हात झटकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारखाना व्यवस्थापन व नातेवाईकांनी मृतदेह तातडीने कर्नाटकातील मूळ गावी हलवला. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाची पोलिसांना किंवा महसूल विभागाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, कोणाचीही तक्रार नाही, असे कारण देत अधिक माहिती देण्यास नकार दिला.