कोल्हापूर, सुनील सकटे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा या मार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे यंदाही महामार्गावर महापुराचा धोका कायम राहणार असून महामार्ग महापूरमुक्त होण्याची शक्यता कमी आहे.
कागल-सातारा महामार्गावर महापुराचे पाणी आल्याने गेल्या तीन वर्षांत दोन वेळा महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे सुमारे आठवडाभर वाहतूक ठप्प होती. या मार्गावर आठ ठिकाणी महापुराचे ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा-कागल रस्त्याचे सहापदरीकणासह महामार्गाची उंची वाढविणे व महापुराचे पाणी थांबणार्या सांगली फाटा ते पंचगंगा पूल या परिसरात महापुराचा धोका लक्षात घेऊन महामार्गाच्या भिंतीस 13 ठिकाणी सिमेंटचे भुयारी मार्ग तयार केले जाणार आहे. महापुराचे पाणी भुयारी मार्गातून पुढे प्रवाहित होणार असल्यामुळे महामार्गावर पाणी येण्याचा धोका संपणार आहे. असे असले तरी पावसाळ्याच्या तोंडावर कामास सुरुवात झाल्याने सध्या केवळ वृक्षतोड सुरू आहे. वृक्षतोडीनंतर प्रत्यक्ष रुंदीकरणास सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी महामार्ग महापूरमुक्त होण्याची शक्यता कमी आहे.
शिरोली येथे महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी उड्डाणपूल आणि नियमित रस्ता अशा दुहेरी वाहतुकीऐवजी आता एकाचवेळी उड्डाणपुलावरून ये-जा करणारी समांतर वाहतूक करण्यात येणार आहे. पंचगंगा नदीवर सध्या दोन पुलावरून वाहतूक सुरू आहे. अरुंद रस्त्यामुळे होणार्या वाहतूक कोंडीचा विचार करून या ठिकाणी आणखी दोन मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. मात्र हे सर्व नियोजन पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे.