कोल्हापूर : महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’अंतर्गत राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. पहिल्याच टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होण्याची दाट शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या चळवळीला आणखी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्रामध्ये जिल्हा बचत गटांच्या चळवळीमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील काही बचत गटांची उत्पादने राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहेत. केवळ जिल्हा परिषदेकडे नोंदविण्यात आलेल्या बचत गटांची संख्या 27 हजार 758 इतकी आहे. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वर्षभर उपक्रम राबविले जातात. दरवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने ताराराणी महोत्सव भरविण्यात येतो. यामध्ये जिल्ह्याबरोबरच राज्यातीलही बचत गट सहभागी होत असतात. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. याशिवाय सणाच्या निमित्ताने वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या वतीने मालाच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. आठवड्यातून दोन दिवस जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात बचत गटाने तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येतात. ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत (उमेद) बचत गटांना व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा जिल्ह्यांत उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्हा परिषदांंकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी जे निकष किंवा अटी घालण्यात आल्या आहेत, त्या निकषास कोल्हापूर जिल्हा परिषद पात्र आहे. त्यामुळे उमेद मॉलसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात येणार आहे.