महिला आरोग्य दिन 
कोल्हापूर

महिलांची जबाबदारीची धावपळ... आरोग्याशी खेळ

Women's Health Day : केवळ 30 टक्के महिला आरोग्याबाबत सतर्क : ‘ती’च्या आरोग्याला कुटुंबातही दुय्यम स्थान

पुढारी वृत्तसेवा
अनुराधा कदम

कोल्हापूर : गृहिणी असेल तर घरकाम, गृहव्यवस्थापन... नोकरदार असेल तर कार्यालयीन कामांचा ताण, वेळेचे व्यवस्थापन, घर आणि कार्यालय यांच्या कामाचा समतोल सांभाळण्याची आव्हाने, आर्थिक नियोजन, मुलांचे संगोपन, संसारिक कारणांसाठी दैनंदिन प्रवासाची दगदग, व्यायामासाठी वेळेचा अभाव आदी विविध जबाबदार्‍यांच्या धावपळीत महिलांना आरोग्याशी कसरत करावी लागते.

शारीरिक व्याधी व मानसिक आजारांच्या जाळ्यात महिला ओढल्या जात आहेत. वेळीच लक्षणे ओळखणे, योग्य उपचार आणि काळजी या त्रिसूत्रीच्या आधारे महिला निरोगी आरोग्याचा आलेख वाढवू शकतात.

ताणतणाव, नैराश्याचा विळखा

महिलांच्या दिनक्रमात वाढणारा मानसिक ताण नैराश्याच्या दिशेने खेचत आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याने थकव्यामुळे अशक्तपणा वाढतो. इन्सोम्निया नावाची झोपेची समस्या हा महिलांच्या आरोग्यातील गंभीर प्रश्न बनला आहे. नोकरदार महिलांना कार्यालयीन आव्हाने पेलताना अवेळी जेवण, जंकफूड सेवनाने लठ्ठपणाला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्याने श्वसनाच्या आजारांनीही महिलांच्या जीवनात शिरकाव केला आहे. मधुमेह, कर्करोग, रक्तदाब, मासिक पाळी व रजोनिवृत्तीचा त्रास, वंध्यत्व, पित्त विकार, किडनी विकार, हृदयरोग यासह आरोग्याच्या किरकोळ तक्रारीही चिंतेचे कारण बनल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम चिडचिड वाढणे, प्रतिकारकशक्तीचा क्षय होणे यावर होत आहे. मजुरी करणार्‍या, कचरावेचक, ऊसतोड, सफाई, बांधकाम कामगार महिलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाल्याचे दिसत आहे. सतत धुळीच्या, कचर्‍यातील दुर्गंधीच्या संपर्कात आल्यामुळे महिलांमध्ये फुफ्फुसाचे विकार वाढत आहेत.

महिला आरोग्याबाबत संशोधन काय सांगते?

  • महिला आरोग्यात सुधारणा झाल्यास देशाचा जीडीपी 34.50 लाख कोटी वाढणे शक्य (जागतिक आर्थिक मंच)

  • आजारपणामुळे आर्थिक सक्रिय नसलेल्या महिलांच्या अंगी असलेली उत्पादन क्षमता व्यर्थ (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च)

  • पुरुषांच्या तुलनेत महिला त्यांचे 25 टक्के आयुष्य खराब आरोग्यासह जगतात (ब्ल्यू प्रिंट टू क्लोज द वूमेन्स हेल्थ गॅप)

  • महिलांच्या आरोग्याबाबत उपस्थित होणार्‍या प्रश्नांचा रेषो 5 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर (महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन अहवाल)

  • 70 टक्के महिला जुनाट आजार व व्याधींनी पीडित आयुष्य जगतात (जर्नल ऑफ पेन मियामी विद्यापीठ)

  • कोलेस्टेरॉल, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा गंभीर आजारांत नियमित औषध घेण्याकडे महिलांचे दुर्लक्ष (जर्नल ऑफ हार्ट असोसिएशन)

महिलांनी आता आरोग्याबाबत अधिक जागरूक झालेच पाहिजे. स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. व्यायामाला प्राधान्य देऊन जीवनशैलीतील हानिकारक सवयींना फाटा देण्याची गरज आहे.
डॉ. मंजुळा पिशवीकर, स्त्रीरोग तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT