महिलांनी उभी केली देशी वाणाची राज्यातील पहिली बीज बँक 
कोल्हापूर

महिलांनी उभी केली देशी वाणाची राज्यातील पहिली बीज बँक

World Women's Day : शेडशाळ महिलांचा जैविक आणि सेंद्रिय शेतीचा ध्यास : 3 गुंठ्यांतून 4 एकरांपर्यंत देशी बियाण्याची शेती फुलली

पुढारी वृत्तसेवा
संतोष बामणे

जयसिंगपूर : आजची महिला मंगळावर पोहोचली आहे. काहींनी एस.टी.चे स्टेअरिंग हातात घेतले, तर काहीजणी विमानाच्या आणि रेल्वेच्या पायलट झाल्या. अशा या आधुनिक जगात महिला आजच्या तंत्रज्ञानानुसार पुढे जात असल्या, तरी शेडशाळ (ता. शिरोळ) येथे 200 महिलांनी आमचे वाडवडील ते पारंपरिक आणि विनाऔषधाचा भाजीपाला पिकवित होते ते आम्हाला मिळाले पाहिजे, यासाठी देशी बियाणांची बँक सुरू करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. या महिलांकडे पारंपरिक आणि देशी असे 90 प्रकारचे बी-बियाणे उपलब्ध असून राज्यातील पहिली स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाऊंडेशन देशी वाण बीज बँक स्थापन केली आहे.

‘नगर में एक बीजमाता राहीबाई है तो क्या हुआ, शेडशाळ में हर एक घर में राहीबाई होगी’ हे ध्येय उराशी बाळगून शेडशाळ येथील 200 महिलांनी एकत्रित येऊन 2019 मध्ये स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाऊंडेशन देशी वाण बीज बँक शेडशाळ या नावाने ही बीज बँक सुरू केली. दत्त समूहाचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ही बीज बँक पारंपरिक, देशी वाणांच्या संगोपन आणि वाढीसाठी देश पातळीवर पोहोचत आहे. पूर्वी 3 गुठ्यांत पिकणारे देशी बियाणे आता 4 एकरांत पिकत आहे. त्यासाठी सेंद्रिय व जैविक शेती तसेच देशी बियाण्यांचे शेडशाळमधील महिलांनी याचा ध्यास जोपासत तब्बल 90 प्रकारचे बियाण्यांचे संकलन केले आहे. या बीज बँकेला पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील प्रशासनातील सर्व अधिकारी, पदाधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. त्याचबरोबर अनेक महिला हे पाहण्यासाठी येत आहेत. तसेच स्वयंसिद्धाच्या सहलीही भेट देत आहेत. या केलेल्या उपक्रमाबद्दल कणेरी मठ, सावित्रीबाई फुले, रोटरी क्लब, सहारा फाऊंडेशन, मराठा मंडळ आदींनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

शासनाकडून मात्र दुर्लक्षितच

शेतात रासायनिक खते व फवारणीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सरकार सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहे. दुसरीकडे आपली पारंपरिक शेती देशी बियाण्यांनी करावी. यासाठी धडपडत असलेल्या शेडशाळच्या बीज बँकेकडे मात्र शासनाने दुर्लक्षच केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे बीजमाता यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे शेडशाळच्या या बीज बँकेला शासनाकडून पाठबळ देण्याची गरज आहे.

शेडशाळ येथे 200 महिलांच्या माध्यमातून निर्माण झालेली देशी वाण बीज बँक आज 4 एकरांमध्ये बियाणे उत्पादित करीत आहे. शिवाय पारंपरिक आणि सेंद्रिय शेतीला महत्त्व देण्याबरोबर आपले देशी बियाणे जोपासणे ही काळाची गरज आहे. आमच्याकडे 90 प्रकारचे देशी बियाणे उपलब्ध असून सर्व महिलांच्या माध्यमातून या बियाणांची देखरेख करून बियाणे सातत्याने उत्पादित करीत आहे. महाराष्ट्र राज्यातील आमची पहिली ही बीज बँक असून शासनाने आम्हाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
शमशादबी पठाण, अध्यक्षा, देशी बीज बँक, शेडशाळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT