कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक तसेच बाजारपेठांसह गजबजलेल्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील व पर्समधील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणार्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. संशयित महिलाकडून दोन लाख 77 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सावित्री सैतू लोंढे (62, रा. मरगूबाई मंदिराजवळ, कागवाड, ता. अथणी, सध्या रा. हातकणंगले), कामिना प्रकाश चौगुले (40, रा. बेघर वसाहत, शाहूनगर, कागल) अशी त्यांची नावे आहेत. हुपरी येथील बसस्थानकावर गुरुवारी (दि. 14) सायंकाळी झालेल्या दागिने चोरीच्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.
कोल्हापूरसह जिल्ह्यातील बसस्थानक आवारासह गजबजलेल्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावर परिधान केलेल्या दागिन्यांसह पर्समधील रोख रक्कम हातोहात लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. हुपरी बसस्थानकावर दागिने चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयित महिलांची नावे निष्पन्न झाली.
चोरीच्या गुन्ह्यातील दागिने विक्रीसाठी महिला तावडे हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अमित सर्जे, युवराज पाटीलसह पथकाने महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. झडतीत त्यांच्याकडे दोन लाख 77 हजार 500 रुपये किमतीचे 39 ग्रॅम दागिने आढळून आले. दोन्ही महिलांना हुपरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.