Kolhapur Woman Chained
कोल्हापूर : कोल्हापुरात उच्चशिक्षित 48 वर्षीय दिव्यांग महिलेला खोलीत कोंडून हाता- पायाला लोखंडी साखळीने बांधून त्यावर तीन कुलपे ठोकलेल्या अन् दीड महिन्यापासून जिवंतपणी मरणयातना सोसणार्या महिलेची स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुटका केली. सारिका हणमंत साळी (रा. राजारामपुरी, दौलतनगर, कोल्हापूर) असे या अभागी महिलेचे नाव आहे. माणुसकीला काळिमा फासणार्या या अमानुष घटनेमुळे करवीरनगरीसह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
महिला संघटनांसह सामाजिक संस्थांनी या क्रूर घटनेचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेच्या भाच्याला ताब्यात घेतले आहे. राजारामपुरी पोलिसांनी याप्रकरणी सायंकाळी भाऊ सूर्यकांत साळी याच्यासह पत्नी व अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कुटुंबीयांच्या अमानुष कृत्यामुळे पीडित महिला भेदरलेल्या अवस्थेत आहे. पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जाऊन तिचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळपर्यंत महिला बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. दीड महिन्यापासून हाता-पायाला, तसेच गळ्याजवळ जाडजूड लोखंडी साखळीने बांधून तीन कुलपे ठोकल्याची माहिती तिने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी बोलताना दिली.
दिव्यांग, अपंग, असहाय व्यक्तीला खोलीत एकाकी कोंडून, साखळदंडाने बांधून तिचा जनावरासारखा छळ करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर व राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील हे कृत्य संतापजनक असल्याचेही ते म्हणाले.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, राजारामपुरी येथील दौलतनगर, पाथरवट वसाहत येथील इस्त्री कारागीर सूर्यकांत हणमंत साळी (वय 50) यांच्या सारिका साळी या कनिष्ठ अविवाहित भगिनी. उच्चशिक्षित; पण गतिमंद आणि अपंगपणामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आहेत. भाऊ, वहिनीसह तिचा भाचा तिची सुश्रूषा करीत. मात्र, अलीकडच्या काळात संबंधित महिला घरच्या मंडळींची नजर चुकवून घराबाहेर पडत असे. दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक करून नुकसान करणे, शेजारी राहणार्यांच्या घरांवर दगडफेक करून शिवीगाळ करणे, गटारीतील अस्वच्छ पाणी स्वत:सह रस्त्यावरून येणार्या-जाणार्यांच्या अंगावर उडविणे, दुकानात, हॉटेल्समध्ये जाऊन स्वत: हाताने खाणे या त्यांच्या कृतीमुळे परिसरातील नागरिकांसह साळी कुटुंबीय हैराण झाले होते.
या घटनांमध्ये वाढ झाल्याने अस्वस्थ कुटुंबीयांनी त्यांना साखळदंडाने बांधून खोलीत डांबून ठेवण्याचा विचित्र निर्णय घेतला, अशीही माहिती चौकशीतून पुढे आली आहे. शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावरून या घटनेचा भांडाफोड झाला आणि संतापाची लाट उसळली.
हे वृत्त शहरात वार्यासारखे पसरताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक दत्तात्रय भोजणे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
सूर्यकांत साळी यांच्या घरावर पोलिसांचे पथक धडकले. मात्र, भाऊ, वहिनी परगावी गेल्याचे सांगण्यात आले. घरात 17 वर्षीय भाचा आढळून आला. दोन नंबरच्या खोलीत हाता- पायासह गळ्याला साखळदंड बांधलेले आणि त्यावर तीन कुलपे ठोकलेली सारिका पोलिसांच्या निदर्शनास आली. दोन कुलपे किल्लीने काढण्यात आली. तिसरे कुलूप तोडून काढून महिलेची साखळदंडातून सुटका करण्यात आली. पोलिसांची कारवाई सुरू असतानाच परिसरातील नागरिकांची साळी यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली. त्यानंतर सारिका यांची शासकीय रुग्णालयाकडे रवानगी करण्यात आली.
बहिणीला साखळदंडात बांधून, कुलूपे ठोकल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर कुंभार यांनी सायंकाळी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दौलतनगर येथील भाऊ सूर्यकांत हणमंत साळी, वहिनी रूपा साळी यांच्यासह विधी संघर्ष मुलाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.