कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वेस्थानकावरील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेल्या कक्षात सुपरवायझर गणेश हंकारे याने साफसफाईसाठी आलेल्या महिला कर्मचार्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज लोहमार्ग पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.
13 एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार घडल्याची फिर्याद पीडित महिलेने दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. 13 रोजी संबंधित महिला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेल्या कक्षाची साफसफाई करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सुपरवायझर गणेश हंकारे याने या कक्षात जाऊन दरवाजा आतून बंद केला. पीडित महिलेने दरवाजाला कडी का लावली, असे हंकारे याला विचारले. त्यावेळी हंकारे याने महिलेच्या तोंडावर हात ठेवत कोणाला काही सांगू नको, अशा भाषेत धमकावले व महिलेवर अत्याचार केला, असे मिरज लोहमार्ग पोलिस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितले.