नागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर श्रीराम टायर येथे ट्रकची दुचाकीस धडक बसून महिला जागीच ठार, तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायं. ६ च्या सुमारास घडला. अपघातात मयत महिलेचे नाव अनिता सुरेश वाघमारे (वय ४७, रा. कोडोली, ता. पन्हाळा) असे आहे. तर जखमी पतीचे नाव सुरेश दादू वाघमारे असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरेश दादू वाघमारे आणि त्यांच्या पत्नी अनिता वाघमारे हे दोघे मोटारसायकल (एम.एच. ०९ ए. व्ही. ३३१) घेऊन गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. भेट आटोपून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावरून शिरोली एमआयडीसीकडून कोडोली येथील आपल्या घरी परत जात असताना ते शिरोली श्रीराम टायरसमोर आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, पती सुरेश वाघमारे हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले, तर त्यांच्या पत्नी अनिता या रस्त्यावर पडल्या. यावेळी ट्रकची चाके त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठविला. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसात झाली आहे.