कोल्हापूर : दसरा चौकाच्या दिशेने येणार्या डंपरखाली सापडून वडणगे (ता. करवीर) येथील मोपेडस्वार महिला जागीच ठार झाली. सुषमा धोंडिराम पाटील (वय 38) असे महिलेचे नाव आहे. जुना बुधवार पेठ येथील भगतसिंग तरुण मंडळासमोर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी डंपरचालक योगेश गोविंद खुटाळे (वय 35, रा. शिये, ता. करवीर) यास रात्री उशिरा ताब्यात घेतले.
सुषमा पाटील या कोंडाओळ परिसरातील एका फर्ममध्ये नोकरीला होत्या. सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर त्या मोपेडवरून जुना बुधवार पेठमार्गे शिवाजी पुलाच्या दिशेने जात असताना दसरा चौकाकडे येणार्या डंपरला धडक होऊन त्या कोसळल्या. डंपरच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. अपघातानंतर काही काळात त्यांचे पती, वडणगेसह शिंगणापूर येथील नातेवाईकांनी घटनास्थळ, शासकीय रुग्णालयात गर्दी केली. सुषमा यांना चार वर्षांचा मुलगा आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.