कासारवाडी : अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथील गोट्यातील गायीला धुण्यासाठी गेलेल्या अश्विनी नितीन चव्हाण (वय.२७) यांना विद्युत मोटारीचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२७) चार वाजताच्या सुमारास घडली.
अंबपवाडी येथे अश्विनी नितीन चव्हाण या घराशेजारीच असलेल्या त्यांच्या जनावरांच्या गोठ्यात गेल्या होत्या. गाय व्याली असल्याने गायीला धुण्यासाठी त्या विद्युत मोटार चालू करत होत्या.त्यावेळी त्यांना विद्युत मोटारीचा शॉक बसला. यामध्ये त्या बेशुध्द होऊन जागीच कोसळल्या. त्यांना वाचविण्यासाठी अश्विनी यांच्या सासू नीता राजाराम चव्हाण गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. पण सुदैवाने त्या वाचल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी येऊन वीज पुरवठा बंद केला. अश्विनी यांना पती नितीन चव्हाण यांनी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी प्रांजली व्हटकर यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अश्विनी यांच्या मागे सासू, सासरे, पती, दोन मुली असा परिवार आहे.