Bike accident news | विहिरीत दुचाकी कोसळून महिलेचा मृत्यू 
कोल्हापूर

Bike accident news | विहिरीत दुचाकी कोसळून महिलेचा मृत्यू

दर्‍याचे वडगाव येथील घटना; पती बचावला

पुढारी वृत्तसेवा

नंदगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पती-पत्नी दुचाकीसह रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत मयुरी विशाल बेनके (वय 30) या विवाहितेचा बुडून मृत्यू झाला, तर तिचे पती थोडक्यात बचावले. करवीर तालुक्यातील दर्‍याचे वडगाव येथे रविवारी रात्री ही घटना घडली.

मयुरी बेनके यांची प्रकृती बरी नसल्याने रविवारी रात्री आठच्या सुमारास त्या पती विशाल यांच्यासोबत गावातील डॉक्टरांकडे जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मयुरी स्वतः दुचाकी चालवत होत्या. घरापासून काही अंतरावर आल्यावर रस्त्यालगतच्या विहिरीजवळ अचानक वार्‍यामुळे मयुरी यांच्या डोळ्यात कचरा गेला. यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि क्षणार्धात दोघेही दुचाकीसह विहिरीत कोसळले. अंधार आणि विहिरीची खोली जास्त असल्याने पती विशाल यांनी मयुरी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यात त्यांचा शोध लागला नाही. विशाल यांनी आरडाओरडा करत जवळच्या घरांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली.

अपघाताची बातमी समजताच युवक आणि ग्रामस्थांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. रूपेश बेनके व त्यांच्या सहकार्‍यांनी मयुरी यांचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. मयुरी यांच्या पश्चात पती, दोन लहान मुली, सासू-सासरे आणि दीर असा परिवार आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक फौजदार अभिजित पाटील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT