चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक मतदार ठरावावरून गाजते आहे. कळे (ता. करवीर) येथील दूध संस्थेच्या सभेत ठरावावरून जो राडा झाला, त्याने गोकुळच्या निवडणुकीचे पुरते वस्त्रहरण केले आहे. ‘ठरावाचा लिलाव करा व आलेली रक्कम सभासदांत वाटण्याची भाषा’ म्हणजे या निवडणुकीने किती तळ गाठलाय, हे स्पष्ट होते.
गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सभासद दूध संस्थांचा ठराव आवश्यक असतो. हा ठराव ज्याच्या नावावर त्याचं किती भलं होतं, हे आता लपून राहिलेलं नाही. एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त ठराव केले जात. आता तर सभासद दूध संस्थांची संख्या सुमारे दोन हजारांनी वाढली आहे. राज्यातील तसेच गोकुळमधील सत्तांतराने निवडणुकीची चुरस वाढली आहे. म्हणूनच जवळजवळ एक वर्षाची मुदत असतानाही आतापासूनच गोकुळची निवडणूक गाजते आहे.