चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
गोकुळ संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुुकीत महायुतीतील घटक पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत. तसे झाल्यास युती अंतर्गत पाडापाडी होणार हे उघड आहे. त्यामुळे या पाडापाडीचा जो काही हिशेब व्हायचा तो गोकुळ संचालक मंडळाच्या निवडणुकीतच होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील जय पराजयाचे उट्टे हे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत निघणार आहेत.
महायुतीतून घटक पक्षात प्रवेश केलेल्यांची व करणार्यांची संख्या मोठी आहे. मोठ्या अपेक्षेने कार्यकर्त्यांनी महायुतीतील घटक पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या तीन वर्षांत या निवडणुका न झाल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष हे मैत्रीपूर्ण लढती करण्याच्या विचारात आहेत. पहिले लढायचे व जिंकल्यानंतर एकत्र यायचे असा हा पॅटर्न आहे. यामागे आणखी एक कारण असल्याचे सांगितले जाते. ते म्हणजे महायुतीतून उमेदवारी नाकारलेला ताकदवान उमेदवार आयता महाविकास आघाडीकडे जाऊन महायुतीला त्याचा फटका बसू नये म्हणून आपसातच लढायचे असा फंडा काही नेत्यांनी काढला आहे. शेवटी राज्यातील नेत्यांच्या निर्णयावर हे सगळे अवलंबून आहे.
संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वीची ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेपूर्वीचे वातावरण व सभेनंतरचे वातावरण यात खूप अंतर पडले आहे. महायुतीचा अध्यक्ष झाला असला तरी सभेत व सभेनंतरही हसन मुश्रीफ व सतेज पाटील एकत्र असल्याचे चित्र दिसल्यानंतर महाडिक गटाने ज्या भाषेत याचा समाचार घेतला, तो पाहता मुश्रीफ व महाडिक यांच्यात महायुती म्हणून जे ऐक्य होणार असल्याचा दावा केला जात होता, त्यातील फोलपणा उघड झाला आहे. जिल्ह्यात महायुतीची ताकद आहे.
विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे आहेत. असे असले तरी त्या त्या मतदारसंघात महायुतीत प्रमुख तीन घटक पक्षांचे नेते आपापली राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ज्या पक्षाचा ज्या विधानसभा मतदारसंघात आमदार आहे त्या विधानसभा मतदारसंघात त्या आमदारांच्या विरोधात महायुतीच्या घटक पक्षातील अन्य दोन पक्षांचे नेते दंड थोपटून उभे आहेत. त्यांच्यात आपसांत ताकद वाढविण्याची ईर्ष्या प्रचंड आहे. त्यामुळे आमदार विरुद्ध घटक पक्षांचे नेते यांच्यातील संघर्ष चुरशीचा आहे.याच संघर्षामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणून लढविण्यास नेते कचवचत आहेत.
सहकारात पक्ष नसतो असे जनतेच्या मनावर वारंवार बिंबवून केडीसीसी बँकेची निवडणूक सर्वपक्षीय म्हणून लढविण्याचा निर्णय झाला. मात्र, ऐनवेळी संजय मंडलिक आणि प्रकाश अबिटकर यांनी पॅनेल केले. त्यांचे तीन उमेदवार निवडून आले. ते आता सत्ताधारी आघाडीचे घटक झाले आहेत, तर ज्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने दंड थोपटले ते महाडिक गटाचे अमल महाडिक जिल्हा बँकेत सत्तारूढ आघाडीतून निवडून आले. आता जिल्हा बँकेत हसन मुश्रीफ यांचा एकहाती कारभार आहे. आता निवडणुकीतील चुरसही वाढणार आहे.