Sugar Price | आठवड्यात साखर स्‍वस्‍त होणार?; सट्टेबाज खरेदीमुळे दरवाढ : ‘इस्‍मा’चा दावा 
कोल्हापूर

Sugar Price | आठवड्यात साखर स्‍वस्‍त होणार?; सट्टेबाज खरेदीमुळे दरवाढ : ‘इस्‍मा’चा दावा

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्‍हापूर : देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसून, गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे किरकोळ बाजारातील साखरेचे दर पुढील आठवडाभर ते दहा दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे, असा ठाम दावा खासगी साखर कारखानदारांची सर्वोच्च संघटना असलेल्या इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) सोमवारी केला.

‘इस्मा’चे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, साखरेच्या दरवाढीमागे केवळ उत्पादनातील घट हे कारण नसून, व्यापारी आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून झालेली सट्टेबाज खरेदीही त्याला कारणीभूत आहे. प्रतिकूल हवामानामुळे यंदाच्या उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी देशातील एकूण साखर उपलब्धतेचे चित्र समाधानकारक आहे.

देशातील साखरेचा ताळेबंद मूलतः आरामदायी आहे. २०२५-२६ हंगामात निव्वळ साखर उत्पादन सुमारे २७९ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. त्याच्या तुलनेत देशांतर्गत मागणी २८० ते २८५ लाख टन असून, हंगामाच्या अखेरीस सुमारे ३५ लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे, असे शिरगावकर यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने एक लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिल्यानंतर बाजारातील दर कमी होण्यास सुरुवात झाली असून, पुढील सात ते दहा दिवसांत ही घसरण आणखी स्पष्टपणे जाणवेल, असा विश्वास ‘इस्मा’चे उपाध्यक्ष माधव बी. श्रीराम यांनी व्यक्त केला. बाजारातील दरवाढीसाठी साखर कारखाने जबाबदार नसून, मागणी-पुरवठ्याबरोबरच व्यापारी पातळीवरील सट्टेबाज खरेदी आणि हवामानामुळे झालेली उत्पादनातील घट हे महत्त्वाचे घटक असल्याचे ‘इस्मा’ने स्पष्ट केले.

ऑक्‍टोबरमध्‍ये मोठे उत्‍पादन अपेक्षित

यंदाचा ऊस गाळप हंगाम सरकारच्या निर्देशानुसार १० ते १५ दिवसांनी लवकर सुरू होणार असल्याने ऑक्टोबरमध्येच साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये ४ ते ५ लाख टन साखरेचे उत्पादन होते. मात्र, यंदा गाळप लवकर सुरू झाल्याने ऑक्टोबरमध्येच सुमारे १० लाख टन साखर उपलब्ध होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT