Shaktipith highway route | शक्तिपीठ महामार्ग राधानगरीतून जाणार? 
कोल्हापूर

Shaktipith highway route | शक्तिपीठ महामार्ग राधानगरीतून जाणार?

तालुक्यात खळबळ; भोगावती नदीवर उभारावा लागणार आणखी एक पूल

पुढारी वृत्तसेवा

आशिष ल. पाटील

गुडाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग होणारच, हे निश्चित झाले असून दक्षिण करवीर आणि कागलमधून जाणार्‍या या महामार्गाला तिथून जोरदार विरोध झाल्यानंतर आता हा मार्ग राधानगरीमधून जाणार असल्याच्या वृत्ताने तालुक्यात खळबळ माजली आहे.

विदर्भातून गोव्याला जाणारा हा बहुचर्चित मार्ग गेली काही वर्षे जमीनबाधित शेतकर्‍यांच्या तीव— विरोधामुळे रखडला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मार्ग जिल्ह्यातून जाणार नसल्याची हमी दिली होती. हातकणंगले, शिरोळ, करवीर दक्षिण आणि कागलमध्ये शेतकर्‍यांनी तीव— विरोध केल्याने या मार्गाचे रेखांकन बदलल्याचे सांगण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यातून पन्हाळा तालुक्यात येणारा हा मार्ग करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, हसूर मार्गे राधानगरी तालुक्यात प्रवेश करणार आहे. राशिवडे - येळवडे परिसरातून भोगावती नदी पार करून हा मार्ग दूधगंगा काठावरून भुदरगडमध्ये जाणार आहे. राधानगरीतून भुदरगडमध्ये जाताना या मार्गावर भोगावती आणि दूधगंगा नदीवर मोठे पूल बांधावे लागणार आहेत.

राधानगरी तालुक्यातील राशिवडे, येळवडे, ठिकपूर्ली, बारडवाडी, तळाशी, कपिलेश्वर, तुरंबे, मालवे या गावातून हा शक्तिपीठ मार्ग पुढे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरातील बहुतांश बागायती जमीन या मार्गात जाण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील शेतकर्‍यांमध्ये खळबळ माजली आहे.

20 कि. मी.मध्ये पाचवा पूल होणार

कसबा तारळे, आवळी बुद्रूक, शिरगाव आणि राशिवडे बुद्रूक अशा 20 किलोमीटरच्या अंतरात भोगावती नदीवर चार मोठे पूल झालेले असताना आता पुन्हा पाचवा पूल होणार असल्याने संभाव्य महापुराच्या भीतीने नदीकाठच्या शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT