Ichalkaranji municipal election | इचलकरंजीत राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे लढणार?  Pudhari File Photo
कोल्हापूर

Ichalkaranji municipal election | इचलकरंजीत राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे लढणार?

भाजप-शिंदे गटाची यादी फायनल; जांभळे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली असून, गुरुवारी मुंबई येथे झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत सुमारे 95 टक्के उमेदवारांची यादी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोणती भूमिका घेणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या परिस्थितीत जांभळे गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत असून, काही प्रभागांत पॅनेल टू पॅनेल प्रचारालाही सुरुवात झाली आहे. यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर शहरात जांभळे गटाच्या पुढील निर्णयाबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजप व शिवसेनेकडून येत्या दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढणार, असे खात्रीशीर संकेत मिळत आहेत. मात्र, कोल्हापूर व मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या अंतिम आदेशानंतरच अधिकृत निर्णय होईल, असे जांभळे गटाकडून सांगण्यात येत आहे. सध्या तरी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुखांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहापूर, गणेशनगर, जवाहरनगर, विकासनगर या परिसरांतील प्रभागांमध्ये जवळपास 15 इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यापैकी अनेकांनी चार सदस्यीय पॅनेल तयार करून घरोघरी प्रचारालाही सुरुवात केली आहे. वरिष्ठांचा निर्णय काहीही असो, आम्ही निवडणूक लढवणारच, अशी ठाम भूमिका इच्छुकांकडून व्यक्त केली जात आहे.

नाराज ‘घड्याळ’च्या वाटेवर?

यंदाच्या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नाराजीचे राजकारणही उफाळून येण्याची शक्यता आहे. विविध पक्षांतील 100 हून अधिक इच्छुक नाराज असल्याची चर्चा असून, पक्षाचे तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे. त्यामुळे ‘घड्याळ’ चिन्हाकडे नाराज इच्छुक वळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT