कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकांची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे काँग््रेाससोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आ. सतेज पाटील यांची फोनवरून युती करण्यासाठी झालेल्या चर्चेसंबंधी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, या चर्चेबद्दल आपणास माध्यमांतूनच समजले. ही चर्चा केवळ पुणे महापालिकेसंदर्भात होती, असेही कळते. परंतु, याबाबतीत नेत्यांकडून आपणास फोन नाही.
ते म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महायुतीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांची पहिली बैठक झाली. या बैठकीस आपल्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक उपस्थित होते. या बैठकीमध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचे ठरले. त्यानंतर कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत आपली बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांची निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर शिक्कामोर्तब झाला.
त्यानंतर जागावाटपाच्या चर्चा करण्यासाठी महायुतीमधील प्रमुख घटकपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती जागावाटपाबाबत चर्चा करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महायुतीसोबतच राहणार आहे. काँग््रेाससोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.