कोल्हापूर : थेट पाईपलाईनसंदर्भात झालेल्या आरोपाचे स्पष्टीकरण सादरीकरणाच्या माध्यमातून पत्रकारांना देताना आ. सतेज पाटील.   (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

MLA Satej Patil | भाजप ठेकेदाराकडून 24 कोटी वसूल करणार का?

‘थेट पाईपलाईनचेच पाणी पिऊन भाषण करता’ : मंत्री पाटील यांना टोला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या अमृत योजनेचा ठेकेदार भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचा मुलगा असल्याचा आरोप करत या ठेकेदारावर ठोठावलेला 24 कोटी रुपयांचा दंड उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील वसूल करणार का, असा खडा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

कावळा नाका व कळंबा येथील पाण्याच्या टाकीतून मंत्री पाटील आणि राज्यसभेचे खासदार यांच्या घरी दोन वर्षांपासून थेट पाईपलाईनचेच पाणी येते. एवढेच नाही, तर या योजनेचे पाणी पिऊनच ते भाषण करण्यास येतात, असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला. मंत्री पाटील यांनी थेट पाईपलाईन योजनेवर टीका करताना या योजनेतील पैसे कसबा बावड्यातील घरात गेले, असा आरोप केला होता. त्याला प्रत्युतर देताना आ. पाटील यांनी ‘थेट पाईपलाईनचे पूर्ण सत्य’ या नावाखाली या योजनेचे सादरीकरण केले. दोन वर्षांची मुदत असलेल्या अमृत योजनेला आठ वेळा मुदतवाढ देऊनही काम अद्याप अपूर्ण आहे. ‘आम्ही पाणी आणले; मात्र भाजपच्या ठेकेदाराने योजना पूर्ण केली नाही, तरीही सत्ताधार्‍यांना हा दंड दिसत नाही का, असा प्रश्न आ. पाटील यांनी केला.

निवडणुका आल्या की, थेट पाईपलाईनचा मुद्दा काढणारे सत्ताधारी, भाजपच्या ठेकेदाराने योजना अपूर्ण का ठेवली, यावर मौन बाळगतात, असा आरोप करत पाटील म्हणाले, थेट पाईपलाईन हा सात लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला लक्ष्य करण्यासाठी कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका. ही योजना काँग्रेसच्या काळात मंजूर झाली असून तिच्या पाठपुराव्यासाठी 55 बैठका व काळम्मावाडी येथे 16 भेटी दिल्याचे सांगून आ. पाटील यांनी 2014 ते 2019 या भाजप-शिवसेना सरकारच्या काळात विविध परवानगी नाकारल्याने काम दोन वर्षे पाच महिने बंद राहिले, असा आरोपही त्यांनी केला.

काळम्मावाडी ते पुईखडी थेट पाईपलाईन पूर्ण झाली असून 1 लाख 7 हजार कनेक्शनद्वारे सुमारे सात लाख लोकांपर्यंत पाणी पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थेट पाईपलाईनचे श्रेय मिळू नये, यासाठी निवडणूक काळात योजनेत अडथळे आणून मला टार्गेट करण्याचे काम केले जाते, असा आरोप आ. पाटील यांनी केला.

योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणार्‍यांनी सत्तेत असताना चौकशी का केली नाही, असा सवाल करत आ. पाटील म्हणाले, केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असती, तरी आम्ही सामोरे गेलो असतो. महायुती विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला टार्गेट करून कोल्हापूरला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या द़ृष्टीने हा विषय इथे संपला असून विरोधकांनी या विषयावर टीका केली, तरी मी उत्तर देणार नाही. काँग्रेसचा जाहीरनामा 7 जानेवारीस जाहीर होईल. दहा दिवस कोल्हापूरच्या विकासाबाबत प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांना कोणीतरी चिठ्ठी दिली असेल

योजनेचे पैसे थेट बावड्याच्या घरात गेले, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, याबाबत ना. पाटील यांना कुणीतरी चिठ्ठी दिली असेल, त्याशिवाय ते असे बोलणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT