कोल्हापूर : २५ इलेक्ट्रिक वाहने, त्यांच्या चालकांचे वेतन आणि वाहनांसाठी चार्जिंग सुविधांची उभारणी, असे तब्बल २७ कोेटी रुपयांचे दान अनंत अंबानी यांनी बालाजीच्या चरणी अर्पण केले. आता करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चरणीही असा सेवाभावी संकल्प होण्यासाठी अनंत अंबानी कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यांनी जगदंबेच्या चरणी सत्पात्री दान अर्पण केले, तर त्यांची तिरुपतीची यात्राही पूर्ण होईल. शिवाय, कोल्हापुरात दाखल होणार्या लाखो भाविकांची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे.
श्री अंबाबाई हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ मानले जाते. देशाच्या कानाकोपर्यातून भाविक येथे येतात. तिरुपतीप्रमाणेच येथेही श्रद्धेचा महासागर असतो. मात्र, वाढत्या भाविकसंख्येच्या तुलनेत वाहतूक, पार्किंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छता, निवारा आणि पर्यावरणपूरक वाहतूक अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर सुविधांची आवश्यकता आहे. याच ठिकाणी तिरुपती आणि करवीर यांच्यातील धार्मिक नाते महत्त्वाचे ठरते. तिरुपतीची यात्रा अंबाबाईच्या दर्शनाने पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या नात्याला सेवेचा आधुनिक पूल का जोडू नये? हा पूल जोडण्याचे काम अनंत अंबानी यांच्या दातृत्वाने होऊ शकते. त्यासाठी कोल्हापूरकरांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
तिरुपतीच्या भक्तांसाठी इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देणार्या उपक्रमाची प्रेरणा घेऊन कोल्हापूरमध्येही भाविकांसाठी इलेक्ट्रिक शटल बससेवा उभारता येऊ शकते. शहराबाहेरील वाहनतळांपासून अंबाबाई मंदिरापर्यंत पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष वाहनसेवा, आधुनिक चार्जिंग केंद्रे, विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत केंद्रे उभारता येऊ शकतात. हे काम केवळ एका उद्योगसमूहाने करावे, असा आग्रह नाही. मात्र, अनंत अंबानी यांनी तिरुपतीमध्ये दाखविलेल्या सेवाभावातून कोल्हापूरसाठी एक नवा आदर्श निर्माण होऊ शकतो. यासाठी अनंत अंबानी यांनी कोल्हापूरला यावे, अंबाबाईचे दर्शन घ्यावे आणि करवीरच्या भूमीतून तिरुपती आणि कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रांना सेवाभावाच्या एका नव्या धाग्याने जोडण्याचा संकल्प करावा, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.
अनंत अंबानी यांना निमंत्रण देण्यामध्ये देणगीपेक्षा मोठा मुद्दा आहे तो धार्मिक वारशाला आधुनिक सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देण्याचा. देवस्थानांना दिल्या जाणार्या देणग्यांचा केंद्रबिंदू केवळ मंदिराच्या वास्तूपुरता न राहता भाविकांच्या अनुभवावर आणि सार्वजनिक सुविधांवर असणे ही काळाची गरज आहे.
...तर नवा साज चढू शकतो
अनंत अंबानी यांनी नांदणी मठातील माधुरी हत्तिणीला उपचारांसाठी गुजरातमधील ‘वनतारा’ येथे आश्रय दिला होता. कोल्हापूरवासीयांचे प्रेम पाहून माधुरी हत्तिणीला पुन्हा सुखरूप नांदणी मठाच्या ताब्यात देण्याचे अभिवचन दिले. तिच्या वैद्यकीय उपचारांची कायमस्वरूपी सोय करण्याची ग्वाही दिली होती. हाच सेवाभाव कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी परावर्तित झाला, तर ‘दक्षिण काशी’ अशी ख्याती असलेल्या, तीर्थक्षेत्र विकासाच्या आघाडीवर धडपडणार्या क्षेत्रावर नवा साज चढू शकतो.