कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला जंगलक्षेत्राचे वरदान लाभले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक जिल्ह्यातील जंगलसफारीचा आनंद घेण्यासाठी येतात. पर्यटनाच्या उत्साहात भरधाव वाहने चालवताना अनेकदा लाखो वन्यजीव चिरडले जातात. पर्यटकांच्या वाहनांच्या वर्दळीत सह्याद्री घाटातील वन्यजीवांचा बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी जिल्ह्यातील धरणक्षेत्र, जंगल परिसरातील वाडीवस्त्यावरील शाळकरी मुलांनी जागृतीची हाक दिली आहे. वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेच्या सहकार्याने आंबोली, तिलारी व आंबा घाटानजीकच्या गावांतील बालचमू पर्यटकांच्या वाहनांना ‘ब—ेक’ लावण्यासाठी संघटित झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांची मांदियाळी सुरू आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील गडकोट, ऐतिहासिक स्थळे, धरण, जंगल या परिसरात येणार्या पर्यटकांचा टक्का वाढत आहे. आंबोली, तिलारी घाटमार्गे कोकण, गोवा मार्ग जोडला जात असल्याने जिल्ह्यातील धरणमार्ग, जंगल परिसराकडे जाणार्या रस्त्यांवर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. या वाहनांचा वेग जास्त असल्याने जंगलांना जोडणार्या रस्त्यावरून जाणार्या वन्यजीवांचा प्रवास धोकादायक बनला आहे. दरवर्षी लाखो वन्यजीव पर्यटकांच्या भरधाव वाहनांखाली चिरडले जात असल्याचे दिसून आले आहे. या रोडकिलिंगमुळे काही दुर्मीळ वन्यजीवांचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. ज्या क्षेत्रात पर्यटनासाठी जात आहोत तेथील वन्यजीवांचा जीव धोक्यात आणू नका, अशी आर्त हाक देत वाडीवस्तीतील शाळकरी मुलांनी पर्यटकांच्या प्रबोधनाचा विडा उचलला आहे.
या उपक्रमात तिलारी परिसरातील कलीवडे मराठी विद्यामंदिर, आंबोली परिसरातील किटवडे धनगरवाडा विद्यामंदिर, पन्हाळा परिसरातील मसूदमाले निवासी शाळा येथील विद्यार्थ्यांनी उपक्रमासाठी घोषवाक्यांचे फलक तयार केले आहेत. नाताळची सुट्टी सुरू झाल्यापासून या विद्यार्थ्यांनी वन्यजीवांच्या रक्षणासाठी पर्यटकांची कानउघाडणी करण्याची मोहीम आखली आहे. प्रभातफेरी काढून पर्यटकांना जंगल, धरण परिक्षेत्रातील वन्यजीवांचे महत्त्व सांगितले जात आहे. सह्याद्री परिसरातील जैविक वारसा जपूया, असा संदेश देत या शाळकरी मुलांनी अनोखा आदर्श दिला आहे.
कोकणमार्गाकडे जाणार्या सुसाट वाहनांखाली गेल्या काही दिवसांत दुर्मीळ सर्प, ससे, भेकर, शेकरू, खार, वाघाटी मांजर यासारख्या वन्यजीवांचा अंत झाला आहे. थंडीच्या वातावरणात ऊब मिळवण्यासाठी हे वन्यजीव रस्त्यालगत किंवा रस्त्यावर येऊन बसतात. सरपटणारे प्राणी रस्ता ओलांडताना सुसाट वाहनांच्या चाकाखाली येतात. जंगलक्षेत्रातून जाणार्या रस्त्यावर वाहनांचा वेग मर्यादीत ठेवण्याचे भान पर्यटकांनी पाळावे, यासाठी या मुलांनी जागृतीची मशाल पेटती ठेवली आहे.