कोल्हापूर : बेसुमार जंगलतोड, चोरट्या शिकारी, जंगलातील मानवी अतिक्रमणे, खाणकाम आणि प्रामुख्याने शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे सह्याद्री पर्वत रांगांमधील वन्यजीव साखळीला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळे जंगलातील वन्यजीवांच्या काही दुर्मीळ प्रजाती नामशेष झाल्या आहेत, तर अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
सह्याद्री पर्वतरांगांचे जागतिक पर्यावरणाच्या द़ृष्टिकोनातून असलेले महत्त्व आणि इथे आढळून येणारी जैवविविधता लक्षात घेऊन युनेस्कोने या पर्वतरांगाना जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल केलेला आहे. मात्र, हे वारसास्थळ जोपासण्यात सगळेच घटक कुठेतरी कमी पडताना दिसतात. या वारसास्थळाची चहूअंगाने मोठ्या प्रमाणात तोड सुरू असून भविष्यात इथली सगळी जैवविविधता लोप पावण्याची भीती आहे.
पर्यावरणाच्या द़ृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असलेल्या या प्रदेशातील छोट्यातील छोटा मानवी हस्तक्षेपसुद्धा मोठ्या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत ठरू शकतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या निसर्ग संवर्धन समितीसह पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ समितीनेही आपल्या अहवालातून तसा इशारा दिला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सध्या या भागाची पोखरण सुरूच आहे. नवनवीन महामार्ग, जंगलांतर्गत रस्ते, अतिक्रमणे यामुळे वन्यजीव साखळी तुटत चाललेली दिसत आहे.
गोव्यातील खाण व्यवसाय न्यायालयीन आदेशाने बंद झाल्यामुळे तिथल्या खाण मालकांनी आता कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली व रायगड जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गात आधीपासून म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपासूनच 56 लोहखाणी आहेत. (त्यातील 39 बंद तर 17 चालू आहेत.) कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत नव्या 49 खाणींचे प्रस्ताव परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. या नव्या खाणी चालू झाल्यास पर्यावरणाला धोका आहे.
दरवर्षी इथल्या समृद्ध जंगलांमध्ये नव्या वन्यजीव प्रजातींचा शोध लागतच आहे. गेल्या काही वर्षांत येथील जंगलांत खेकड्यांच्या 15, आवाज करणार्या किंवा ओरडणार्या सरड्यांच्या 3, बेडकांच्या 4, सापाच्या 3 व माशांच्या 18 नवीन प्रजाती आढळून आलेल्या आहेत. याशिवाय वनस्पतींच्याही नवनव्या प्रजातींचा शोध लागताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर इथल्या जंगलांमधील जैवविविधता आणि वन्यजीव साखळीचा नव्याने सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
120 प्रजाती सस्तन प्राण्यांच्या
508 प्रजाती विविध पक्ष्यांच्या
156 प्रजाती उभयचर प्राण्यांच्या
151 प्रजाती सरपटणार्या प्राण्यांच्या
218 प्रजाती गोड्या पाण्यातील माशांच्या
1600 प्रजाती विविध फुलपाखरांच्या
6,000 प्रजाती वेगवेगळ्या किटकांच्या
4,000 वनस्पती सह्याद्री पर्वतरांगांत
95 वन्यजीव प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर