कोल्हापूर : उन्हाळ्याने चाहूल दिली की, जंगलपट्ट्यातील रानमेव्याची चव चाखण्याचे वेध लागतात. गावाकडचे रस्ते पार करत करवंद, आवळा, जांभूळ, नेर्ले, फणस, रतांबे, कैर्या, रानफळे, बिया, मोहर असा रानमेवा शहरातील खवय्यांपर्यंत पोहोचतो; पण याच रानमेव्यापासून महिलांनी विविध पदार्थ बनवून वेगळी चव आणि दर्जा यांचा मिलाफ घडवला आहे. राज्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून रानमेव्यापासून प्रक्रिया उद्योगाने महिलांच्या पाककौशल्याला पोषक बनवले आहे. रानमेव्यापासून तयार होणार्या पदार्थांची बाजारपेठ महिलांना आर्थिक सक्षम बनवत आहे.
उन्हाळ्यातील हंगामी फळे, रानमेवा म्हणजे डोंगरी भागातील अस्सल मेवा. या फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ बनवण्याचा उद्योग राज्यातील बचत गटांच्या महिलांकडून केला जात आहे. गेल्या 25 वर्षांत रानमेव्याने महिला बचत गटांना आर्थिक बळ दिले असून हे पदार्थ राज्याबाहेरील ग्राहकांच्याही पसंतीस उतरले आहेत. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई परिसरातील विरार वसई भिवंडी कल्याण, डहाणू, विदर्भ, मराठवाड्यातील आदिवासी पाडे येथील महिलांसाठी आर्थिक कमाईचे साधन म्हणून रानमेव्याचा आधार मिळत आहे.
कोकणातील बहुतांश भाग, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, आंबा या भागातील डोंगरपट्ट्यातील जाळींमध्ये करवंदे मोठ्या प्रमाणात पिकतात. नैसर्गिक वाढ झालेल्या या करवंदांमध्ये हिरव्या आणि काळ्या करवंदांना मागणी असते. महिला बचत गटांच्या संघटनातून जाळीतली करवंदे खरेदी केली जातात. त्यापासून तयार होणार्या सरबत, लोणचे, चटणी, क्रश, छुंदा, साटे यांना चांगली किंमत येते. गेल्या दोन दशकांत महिलांना या जाळीतल्या करवंदांनी आर्थिकद़ृष्ट्या सक्षम केले आहे.
महिला बचत गटांमार्फत चालवण्यात येणारा आवळ्याचा प्रक्रिया उद्योगही राज्यात जोरकसपणे सुरू आहे. यामध्ये आवळा सरबत, मोरावळा, आवळा कँडी, आवळा सुपारी या उद्योगाने भरारी घेतली आहे. उन्हाळ्यात पित्तनाशक म्हणून आवळा व त्यापासून बनणार्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महिलांनाही रोजगाराची संधी व्यापक होते.
चैत्राच्या उंबरठ्यावर जांभूळ, कैरी, रतांबे, काजूबोंडू, फणस हा रानमेवा दाखल झाला की, त्यापासून नवनवे साठवणुकीचे पदार्थ करण्याची लगबग महिला बचत गटांमध्ये सुरू होते. जांभळापासून बनणारे सरबत मधुमेहावर गुणकारी असल्याने वर्षभर या सरबताला मागणी असते. आंबापोळी, फणसपोळी, सुकवलेले गरे, रतांब्याच्या सालीपासून आमसुलाचा आगळ, कोकम सरबत, कोकमकँडी, काजूवडी, बोंडूसरबत, पन्हे पावडर, कैरीचा छुंदा, लोणचे, मुरांबा अशा पदार्थांनी रानमेव्याला वेगळी चव आणि रूप देत महिलांचे पाककौशल्यही बहरते.
राज्यात साडेचार लाख बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिला संघटित झाल्या आहेत. यापैकी किमान दोन लाख महिला बचत गटांनी रानमेव्यावर प्रक्रिया उद्योगाची कास धरली आहे. राज्यातील एकूण बचत गटांपैकी 40 टक्के बचत गट हे कोकण, पश्चिम महाराष्ट, मुंबई, ठाणे, विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये आहेत. रानमेव्याचे पीक याच भागात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने त्यापासून प्रक्रिया उद्योगात झेप घेत महिलांनी आर्थिक कमाईचे साधन निर्माण केले आहे.