Kolhapur News 
कोल्हापूर

Kolhapur News| चरण येथे स्फोटकाने रानडुक्कराची शिकार; तिघे वनकोठडीत

Kolhapur News | शाहूवाडी तालुक्यातील चरण गावच्या हद्दीत रानडुक्कराची स्फोटकांच्या साहाय्याने बेकायदेशीर शिकार करणाऱ्या तिघांना शाहूवाडी-मलकापूर वन विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur News

शाहूवाडी तालुक्यातील चरण गावच्या हद्दीत रानडुक्कराची स्फोटकांच्या साहाय्याने बेकायदेशीर शिकार करणाऱ्या तिघांना शाहूवाडी-मलकापूर वन विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे. साहिल ऊर्फ कार्तिक अशोक लाड (वय २३, रा. चरण, ता. शाहूवाडी), युवराज ऊर्फ जोतिराम विठ्ठल पाटील (वय ४६) आणि विजय ऊर्फ राजू भगवान नायकवडे (वय ४७, दोघेही रा. सावर्डे तर्फ सातवे, ता. पन्हाळा) अशी संशयितांची नावे आहेत.

वन विभागाला गुरुवारी (ता.११) टोल फ्री क्रमांक १९२६ वर गोपनीय माहिती मिळाली होती की, चरण गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार झाली आहे. त्यानुसार उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून कारवाई करण्यात आली.

पथकाने साहिल ऊर्फ कार्तिक लाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबातून युवराज पाटील आणि विजय नायकवडे यांची नावेही समोर आली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने या तिघांच्या घरांची झाडाझडती घेतली. यामध्ये रानडुक्कराचा सुळा दात, मोठा सुरा, भाजण्यासाठी वापरलेली गॅस शेगडी, १२ जिवंत स्फोटक गोळ्या, ३ मोबाईल संच असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सर्व संशयितांनी स्फोटकांच्या गोळ्यांचा वापर करून रानडुक्कराची शिकार केल्याची कबुली दिली आहे. वन विभागाने संशयितांना शनिवारी (ता.१४) शाहूवाडी-मलकापूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मलकापूर वन परीक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदूम यांनी दिली.

या प्रकरणात आणखी काही साथीदार सामील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास शाहूवाडी-मलकापूर वन विभागाचे अधिकारी करत आहेत.

कारवाईदरम्यान परिमंडळ वनाधिकारी नाथा पाटील, सदानंद जगताप, वनरक्षक सुशील शिरसाट, आशिष पाटील, अक्षय चौगुले, गुरुबच्चन हिप्परकर, हृषीकेश झान्जुर्णे, आबासाहेब परीट, अभिजित कदम, वाहन चालक अनिल पाटील तसेच विशेष पथकातील सदस्य उपस्थित होते.

वन विभागाने जनतेला आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या बेकायदेशीर शिकारीची माहिती तातडीने १९२६ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT