Shahuwadi Chandoli villages fear
आनंदा केसरे
बांबवडे : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील चांदोली धरण व चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली गावे सध्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. डोंगरदऱ्यांत आणि जंगलाच्या सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांचा एकच सवाल आहे – “सांगा, आम्ही जगायचं कसं?” गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीत होणारे हल्ले सातत्याने वाढले असून, त्यात काही निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.
बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, गवे यांसारख्या जंगली प्राण्यांचा वावर थेट गावांच्या हद्दीत पोहोचला आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही या प्राण्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पर्यटनस्थळांच्या आसपासच्या भागात बाहेरील परिसरातून काही हिंस्त्र प्राणी सोडले जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या गावांमध्ये जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या सततच्या घटनांमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जीवाच्या भीतीने शेतकरी व मजूर शेतात किंवा मजुरीस जाणे टाळत आहेत. पालकांसाठी मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे बनले असून अनेक ठिकाणी शाळकरी मुले घरीच थांबलेली दिसत आहेत. परिणामी शिक्षण, शेती आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे.
वनविभागाकडून काही ठिकाणी नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. “घरात बसून पोट कसं भरणार? मुलांचं शिक्षण कसं चालणार?” असे सवाल उपस्थित करत संतप्त नागरिक प्रशासनाकडे ठोस आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी करत आहेत.