Domestic murder case | मद्य प्राशनाला कंटाळून पत्नीकडून मुलांच्या मदतीने पतीचा खून  
कोल्हापूर

Domestic murder case | मद्य प्राशनाला कंटाळून पत्नीकडून मुलांच्या मदतीने पतीचा खून

कबनूर परिसरात खळबळ : तिघांना अटक; 4 दिवस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : मद्य प्राशन करून शिवीगाळ व मारहाण करणार्‍या पतीचा पत्नीनेच मुलांच्या मदतीने खून केला. बाळू बापू बामणे (वय 58, रा. कबनूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सुनीता बाळू बामणे (45) तसेच मुले यश बामणे (20) व ओम बामणे (23, सर्व रा. शिवाजी कॉर्नर) या संशयितांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अमोल गणपती बामणे (37 रा. सहारानगर, रूई) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बाळू बामणे याला दारूचे व्यसन होते. तो मद्य प्राशन करून पत्नी आणि दोन्ही मुलांना शिवीगाळ, मारहाण करीत होता. गुरुवारी रात्रीही बाळू याने तिघांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या सततच्या मारहाणीला कंटाळून सुनीता, यश आणि ओम यांनी बाळू याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, पाठीत चाकूने वार केला. वार वर्मी बसल्याने बाळू याचा मृत्यू झाला.

दरम्यान बाळू घरी पाय घसरून पडून जखमी झाल्याचा बनाव पत्नी आणि दोन्ही मुलांनी केला. मात्र, जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांना संशय आला. त्यांना पुढील उपचारासाठी दुसर्‍या दवाखान्यात हलवण्यात आले. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी धाव घेऊन बामणे यांच्या मुलांकडे कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच पत्नी व दोन्ही मुलांनी मिळून बामणे यांचा खून केल्याचे कबूल केले. तिघाही संशयितांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT