Wife death domestic violence | पतीकडून अमानुष मारहाणीत गंभीर जखमी पत्नीचा मृत्यू 
कोल्हापूर

Wife death domestic violence | पतीकडून अमानुष मारहाणीत गंभीर जखमी पत्नीचा मृत्यू

पतीवर खुनाचा गुन्हा : नातेवाईकांचा आक्रोश; पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पतीकडून अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी दुपारी मृत्यू झाला. स्वाती गणेश हुबाळे (वय 40, रा. सोन्या मारूती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) असे महिलेचे नाव आहे. आठवड्यापूर्वी अमानुष मारहाण झाली होती. स्वातीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आक्रोश करीत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. संशयित गणेश शंकर हुबाळे (वय 43) याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संशयित गणेश हुबाळे फरारी झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. संतप्त नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारून संशयिताच्या अटकेची जोरदार मागणी केली. संशयिताला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाची स्थिती होती. रात्री उशिरा पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी सांगितले.

पोलिस सूत्रांकडून तसेच स्वाती हुबाळे यांच्या नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, स्वाती आणि गणेश हुबाळे यांचा 2012 मध्ये प्रेमविवाह झाला असून, दाम्पत्याला दोन मुलेही आहेत. स्वातीचे माहेर राजोपाध्येनगर येथील बी.डी. कामगार वसाहत येथे आहे. तर गणेश शनिवार पेठ येथील सोन्या मारूती चौकाजवळ राहतो. त्याचे कोल्हापुरी फेट्याचे दुकान आहे.

पती-पत्नी यांच्यात वारंवार भांडणे

गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नी यांच्यात वारंवार भांडणे होत होती. स्वातीने याबाबत माहेरच्या मंडळींना कल्पना दिली होती. भाऊ प्रवीण यांनाही तिने पतीकडून होणार्‍या छळाबाबत माहिती दिली होती. माहेरकडील मंडळींनी हस्तक्षेप करून त्यांच्यात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेश ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

गणेशच्या बाहेरच्या संबंधाचा संशय : अमानुष मारहाणीने अत्यवस्थ

पती-पत्नी यांच्यातील वाद वाढतच गेला. गणेशचे बाहेरचे संबंध असल्याची माहिती स्वातीला समजली होती. त्यानंतर पुन्हा वाद वाढत राहिला. त्यातून गणेशने पत्नी स्वाती हिला दि. 7 फेब—ुवारीला अमानुष मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र, गणेशने ही माहिती स्वातीच्या माहेरकडील मंडळींना न कळविता ती बेपत्ता असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर माहेरकडील नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी 24 तासांनंतर या, तोपर्यंत शोध घ्या, असा सल्ला दिला.

प्रकृती गंभीर... बोलताही येत नव्हते!

दरम्यानच्या काळात स्वाती कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी स्वातीची भेट घेऊन तिच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी स्वातीने केवळ आपणाला मारहाण झाल्याचे सांगितले. प्रकृती अत्यवस्थ बनल्याने तिला बोलताही येत नव्हते, असेही नातेवाईकांनी सांगितले.

अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही : नातेवाईकांची भूमिका

सोमवारी दुपारी स्वाती हिचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी रुग्णालयासह लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. संशयिताला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी पोलिस ठाण्यासमोर आक्रोश सुरू केला. स्वातीची आई जयश्री भाट यांनी रात्री उशिरा संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनीही स्वातीच्या माहेरकडील नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाईक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT