Satara-Kagal Highway
सातारा-कागल महामार्ग ARJUNDTAKALKAR
कोल्हापूर

कोल्हापूर : रुंदीकरणातील प्रमुख कामे दीर्घकाळ प्रलंबित!

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : सातारा-कागल महामार्गाच्या रुंदीकरणातील जी प्रमुख कामे आहेत, तीच मागील दोन वर्षांपासून रेंगाळत पडलेली आहेत. सगळ्या कामांची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे. मागील दोन वर्षांपासून या महामार्गावरील वाहतुकीचा सगळा भार आधीच चिंध्या झालेल्या सेवा रस्त्यांवर पडला आहे.

सगळीच कामे अपुरी!

या महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत नागठाणे, कराड, येवलेवाडी, मलकापूर, मसूर फाटा, नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी, वाघवाडी, कामेरी, कणेगाव, येलूर, तांदूळवाडी, नागाव फाटा, लक्ष्मी टेकडी या 15 ठिकाणी नियोजित उड्डाणपूल आहेत. यापैकी जवळपास प्रत्येक उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आलेले आहे. मात्र, आजतागायत यातील एकही काम पूर्ण झालेले नाही. बहुतेक सगळ्या कामांची सुरुवात केल्यानंतर बराच काळ ती प्रलंबित पडलेली दिसतात. शिवाय, 20 ते 25 ठिकाणी फुटवेअर ब्रिज नियोजित आहेत; पण त्यांचीही कामे बर्‍याच काळापासून प्रलंबित दिसत आहेत. याच रुंदीकरणाच्या कामांतर्गत पंचगंगा नदी, वारणा नदी, उरमोडी नदी आणि घुणकी नाल्यावर मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. मात्र, या पुलांची कामेसुद्धा दीड-दोन वर्षांपासून रडतखडत सुरू आहेत.

सेवा रस्त्यांची दुर्दशा!

एकाचवेळी ही सगळी कामे सुरू करण्यात आल्यामुळे आणि त्यासाठी पूर्वीचा चौपदरी महामार्ग बंद करण्यात आल्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीचा सगळा भार दोन्ही बाजूला नव्याने तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्यांवर पडलेला आहे. मात्र, दररोज जवळपास लाखभर लहान-मोठ्या वाहनांचा भार सहन करण्याइतके हे सेवा रस्ते सक्षम नाहीत. त्यामुळे या सेवा रस्त्यांची अल्पावधीतच वाट लागलेली आहे. ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडलेले आहेत, काही ठिकाणी रस्ते खचले आहेत, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, काही ठिकाणी हे सेवा रस्ते अरुंद आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून सध्या या महामार्गावरून वाहतूक करताना चालकांना कसरत तर करावीच लागत आहे; पण अनेक अपघातांनाही तोंड द्यावे लागत आहे.

अपघाती महामार्ग!

आज राज्यातील सर्वाधिक अपघाती महामार्ग म्हणून सातारा-कागल महामार्गाची नोंद झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, दिशादर्शक फलक नसल्यामुळे, खड्ड्यांमुळे व महामार्गाच्या अपुर्‍या कामांमुळे या रस्त्यावर दररोज छोटे-मोठे किमान दहा तरी अपघात होतातच. या अपघातांमध्ये वर्षाकाठी जवळपास 100 ते 125 लोकांचा बळी जात आहे. मात्र, या महामार्गाचे काम करणार्‍या कंपन्या आणि शासनाला जणू काही अपघातांत मरणार्‍यांचे सोयरसूतकच नाही, अशी सगळी अवस्था आहे. या महामार्गावर लक्ष्मी टेकडी, तावडे हॉटेल ते टोप, किणी पूल, कणेगाव, तांदूळवाडी, येलूर, कामेरी, नेर्ले, कासेगाव, मलकापूर, कराड, उंब्रजसह जवळपास 25 ठिकाणी अपघाताचे ‘ब्लॅक स्पॉट’ तयार झाले आहेत. या ठिकाणी दररोज हटकून अपघात होताना दिसतात; पण कुणी या अपघातांकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही.

पुलांची पुनर्बांधणी!

या महामार्गांतर्गत सांगली फाटा, कराड, उजळाईवाडी, उचगाव, कागल, इटकरे, कराड आणि उंब्रज येथे जुन्या पुलांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मात्र, ही कामेही प्रदीर्घ काळापासून अत्यंत धिम्यागतीने आणि रडतखडत सुरू असलेली दिसतात. कराड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. केवळ कराड येथे होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना तास-दोन तास उशीर लागत आहे. कराड उड्डाणपुलाचे काम अजून निम्मेअर्धेदेखील पूर्ण झालेले नाही. शिवाय, अतिशय संथगतीने हे काम सुरू असल्यामुळे अजून किती काळ हे काम चालेल, याची शाश्वती नाही.

ठेकेदारांवर दबाव आवश्यक!

मागील दोन वर्षांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणातील खेळखंडोब्यामुळे वाहतुकीचा पार सत्यानाश झाला आहे. मात्र, ठेकेदार कंपन्या आपल्याच तालात निवांतपणे काम करीत असलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी शासनाने ठेकेदार कंपन्यांवर दबाव आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे जानेवारी 2025 या नियोजित मर्यादेत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदार कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही आवश्यकता आहे.

कोल्हापूरच्या ‘बास्केट ब्रिज’चा थांग ना पत्ता!

सातारा-कागल महामार्गाच्या रुंदीकरणाचाच एक भाग म्हणून तावडे हॉटेल ते मार्केट कमिटीदरम्यान 1,303 मीटर अंतराचा ‘बास्केट ब्रिज’ बांधण्याची घोषणा झाली. अनेकांनी त्याचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला; पण गेल्या दोन वर्षांत या तथाकथित ‘बास्केट ब्रिज’च्या बांधकामाचे कुठे नामोनिशाणही नाही. कराडात जुना पूल पाडून नव्या पुलाची उभारणीही सुरू झाली; पण कोल्हापुरातील नियोजित ‘बास्केट ब्रिजची कुठे पायाभरणीही झालेली नाही.

SCROLL FOR NEXT