कोल्हापूर : ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस फसवणूकप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींच्या खात्यावर 301 कोटी रुपये असतानाही त्यांची खाती का गोठविली नाहीत. आरोपींचे बँकेत एक किलो सोने असल्याचे फिर्यादींनी सांगूनही ते जप्त करण्याची कारवाई का केली नाही, अशी विचारणा करत ग्रोबझ प्रकरणात तपास करणार्या तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलिसांना सर्किट बेंचने सोमवारी चांगलेच धारेवर धरले.
बलकवडे यांना तपासाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कोल्हापूरमधील गाजलेल्या ग्रोबझ ट्रेडिंग आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयितांच्या जामिनासाठी सर्किट बेंचमध्ये अर्ज दाखल आहे. त्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 19 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या कार्यकाळात चार्जशीट दाखल झाल्याने त्यांना प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे आदेश सर्किट बेंचने दिले होते. त्यानुसार बलकवडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहिले.
न्यायमूर्ती दिगे यांनी शैलेश बलकवडे यांना विचारणा केली की तुम्ही जिल्हा पोलिस अधिक्षक असताना आपल्या काळात हा गुन्हा घडला होता, आपल्या काळात पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली होती, किती आरोपींना अटक केली, किती आरोपींची मालमत्ता जप्त केली, एमपीआयडीची प्रोसेस तुम्ही का केली नाही, फॉरेन्सिक ऑडिटरचे काय झाल, आरोपींच्या व कंपन्यांच्या खात्यावर अनुक्रमे 40 कोटी, 90 कोटी, 171 कोटी असा फंड असताना तुम्ही वेळीच आणि तत्काळ त्यांची बँक खाती का गोठवली नाहीत, असा प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर करण्यात आला.
गुंतवणूकदारांनी वेळोवेळी पोलिस अधिकार्यांना, आपल्याला माहिती देऊनही आरोपींची मालमत्ता का जप्त केली नाही, अजूनही आरोपींना का अटक केले नाही तसेच त्या लोकांचे जबाब का घेतले नाहीत, असा सवाल न्यायालयाने केला. ज्या पद्धतीने तुम्ही सर्व लोकांनी या गुन्ह्याचा तपास केला आहे, हे योग्य नाही. याप्रकरणी तुम्हीही प्रतिज्ञापत्र सादर करा, तुमच्या सर्वांचे प्रतिज्ञापत्र वाचून पुढे काय निर्णय घ्यायचे ठरविले जाईल, अशा शब्दांत न्यायमूर्ती दिघे यांनी फटकारले. प्रश्नांची सरबत्ती केली आणि नाराजीही व्यक्त केली. बलकवडे यांनी 9 जानेवारी 2026 रोजीच्या तारखेला लेखी स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.