आचारसंहितेत अडकणार ऊस दराचा तिढा Pudhari File Photo
कोल्हापूर

Sugarcane Price Issue | यंदा ऊस दराची कोंडी कोण फोडणार?

२४ कारखाने गाळपासाठी सज्ज; पहिली उचल साडेपाच हजार देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

एकनाथ पाटील

भडगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात यंदाच्या ऊस दरावरून संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी ऊस दराच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर चर्चा झाली. मात्र, अंतिम दराबाबत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यंदा उसाची कोंडी कोण फोडणार व पहिली उचल किती असणार, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनांकडून यंदा पहिली उचल ५ हजार ५०० रुपये प्रतिटन देण्याची मागणी होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या २५ व्या ऊस परिषदेत यंदाच्या हंगामासाठी साडेपाच हजार रुपये प्रतिटन मिळावेत, अशी मागणी केली आहे. ऊस दराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्र सरकारने २०२६-२७ गळीत हंगामासाठी १०.२५ टक्के साखर उतार्‍यावर प्रतिटन ३,६५० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. मात्र, साखरेच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीसह शेतीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन हजार रुपयांचा ऊस दर परवडणार कसा, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून २४ साखर कारखाने असून, गळीत हंगामासाठी बहुतांश कारखान्यांची यंत्रणा सज्ज झाली आहे. ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्याही जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एखादा कारखाना पुढाकार घेऊन ऊस दर जाहीर करणार की शेतकरी संघटना, कारखानदार व शासन यांच्यातील संघर्षानंतर दर निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादनावरही झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपलब्ध ऊस महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, उत्पादन घटल्याने शेतकर्‍यांच्या उसाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. दसरा सण संपला असून, आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यापूर्वी ऊस दराची कोंडी फुटून पहिली उचल जाहीर व्हावी, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, दराबाबत निर्णय लांबल्यास ऐन दिवाळीत ऊस दराचे आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरासाठी वेग येण्याची शक्यता?

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त होते. आता निवडणूक संपल्याने साखर कारखान्यांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस दराबाबत बैठका होऊन प्रश्न मार्गी लागणार की ऐन दिवाळीत ऊस दराचे आंदोलन पेटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT