Fake Drugs | भारतात बनावट, दर्जाहीन औषधांच्या सुळसुळाटाला जबाबदार कोण? 
कोल्हापूर

Fake Drugs | भारतात बनावट, दर्जाहीन औषधांच्या सुळसुळाटाला जबाबदार कोण?

‘कोल्डरिफ’ औषधामुळे 22 निष्पाप बालकांच्या मृत्यूने देश हादरला

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : जागतिक आरोग्याच्या पटलावर 2022 आणि 2023 या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. उझबेकिस्तानमध्ये खोकल्याचे औषध घेतल्यामुळे 68 बालकांचा मृत्यू झाला, तर ऑक्टोबर 2022 मध्ये गॅम्बियात अशाच प्रकारच्या खोकल्याच्या औषधाने 70 बालकांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी जागतिक पातळीवर भारताची मोठा नाचक्की झाली. याचे कारण या खोकल्याचे औषध बनविणार्‍या कंपन्या भारतीय होत्या. या घटनांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. भारतात बनावट, दर्जाहीन औषधांच्या सुळसुळाटाला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन भारतातून निर्यात होणार्‍या प्रत्येक औषधाची पूर्वचाचणी घेतल्याखेरीज औषधे निर्यात केली जाणार नाहीत, असे निर्बंध आणले. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण पावलाने निर्यात बाजारपेठेशी संबंधित रुग्णांचे आरोग्य सुरक्षित झाले. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत अंकुशाअभावी बनावट औषधे निर्माण करणार्‍या माफिया टोेळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. सर्वच काही रामभरोसे चालले आहे. यामुळेच गेल्या पंधरवड्यात भारतात 23 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. या मृत्यूची जबाबदारी स्वीकारणार कोण, हा खरा प्रश्न आहे.

उझबेकिस्तान आणि गॅम्बिया या दोन ठिकाणी ज्या औषधांनी भारतीय औषध उद्योगाची नाचक्की केली, त्यामध्ये उत्तरेतील मॅरियॉन बायोटेक, मेडन फार्मा या औषध कंपन्यांचा समावेश होता. त्यांनी निर्बंध असलेल्या इथेलिन ग्लायकॉल व डाय इथेलिन ग्लायकॉल या मूलद्रव्यांचा मर्यादेपलीकडे औषधांमध्ये वापर केल्याचे निष्पन्न झाले होते. गेल्या पंधरवड्यात तामिळनाडूच्या श्रेसन फार्मा या कंपनीने त्याचाच कित्ता गिरविल्याचे चित्र समोर आले. पहिल्या दोन घटनांमध्ये जबाबदार असलेल्या औषध कंपन्यांवर केंद्र सरकारने कारवाई केली. त्यांचे परवाने रद्द केले. याच पद्धतीने तामिळनाडूतील चेन्नईस्थित कंपनीवरही कारवाई होईल.

पण या दरम्यान झालेल्या निष्पाप बालकांच्या मृत्यूचे काय? वरकरणी या मृत्यूला चेन्नईची श्रेसन फार्मा ही कंपनी जबाबदार असल्याचा निष्कर्ष कोणीही काढेल. परंतु याला श्रेसन फार्माबरोबरच भारतातील रुग्णांच्या आरोग्याकडे पाहण्याच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातील गांभीर्याचा अभाव जसा कारणीभूत आहे, तसे औषधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणार्‍या राष्ट्रीय औषधे दर्जा नियंत्रण संस्थेसह केंद्रीय व राज्य अन्न व औषध प्रशासन आणि कारवायांवर दबाव टाकणारे, कारवायांच्या मोबदल्यात गुन्हेगारांबरोबर मांडवली करणारे राज्यकर्तेही जबाबदार आहेत. जोपर्यंत विस्कटलेली ही घडी दुरुस्त होत नाही, तोपर्यंत अशा अनेक श्रेसन फार्मासारख्या कंपन्या कार्यरत राहतील आणि निष्पापांच्या बळींना रोखणे कठीण आहे.

श्रेसन फार्मा या कंपनीच्या ‘कोल्डरिफ’ या औषधामुळे लहान बालकांची मूत्रपिंडे निकामी होऊन बालकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या औषधाने मध्य प्रदेशातही आपले परिणाम दाखवून मृत्यूंची नोंद केली. या प्रकरणी कंपनीचे मालक गोविंदन रघुनाथन यांना अटक करण्यात आली आणि देशातील काही राज्यांनी या औषधावर बंदीचे परिपत्रक जारीही केले आहे. त्याची यथावकाश चौकशी होईल. परंतु जोपर्यंत बनावट औषधे निर्मिती उद्योगाच्या मुळावर घाव घातले जाणार नाहीत, तोपर्यंत भारतीयांच्या आरोग्यावर असुरक्षिततेची तलवार टांगती राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT