Kolhapur Airport | कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी? 
कोल्हापूर

Kolhapur Airport | कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?

३६५ कोटींचा प्रस्ताव सादर; दिल्लीतून गती देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी विस्तारणार कधी? असा सवाल आता उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासनाने धावपट्टी विस्तारीकरणाचा ३६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सादर केला आहे. त्यावर तातडीने निर्णय होऊन प्रत्यक्षात काम सुरू होण्याची गरज आहे.

कोल्हापूर विमानतळाने गेल्या आठ वर्षांत आपली क्षमता सिध्द केली आहे. या कालावधीत आतापर्यंत सुमारे १० लाख ६३ हजारांवर प्रवाशांनी या विमानतळावरून ये-जा केली आहे. कोल्हापूरला धार्मिक, पर्यटन, औद्योगिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रांमुळे असणारी मोठी संधी, कोल्हापूरचा विमानतळासाठी अधिक फायदेशीर ठरणारी आहे. याकरीता विमानतळाचाही विकास गतीने होण्याची गरज आहे.

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६४ एकर जमिनीची गरज होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व जमीन विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात दिली आहे. सध्या विमानतळाची धावपट्टी १९०० मीटर इतकी आहे, त्यापैकी १७४० मीटरच्या धावपट्टीचा वापर केला जात आहे. ही धावपट्टी २३०० मीटरपर्यंत विस्तारीत केली जाणार आहे. जागा उपलब्ध झाल्याने त्यासाठीचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाला सादर केला आहे. या प्रस्तावानुसार उच्चाधिकार समितीने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यापुढील प्रक्रियेसाठी संभाव्य विस्तारीत जागेचा सर्व्हे आणि आवश्यक छायाचित्रांची गरज आहे. या कामाची जबाबदारी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सोपवली आहे.

या सर्व प्रक्रिया आता गतीने होण्याची गरज आहे. उच्चाधिकार समितीने विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला गती दिली, तर निधी मंजूर होऊन या वर्षाअखेरपर्यंत प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होऊ शकते. याकरीता नियोजनबध्द पद्धतीने पाठपुरावा होण्याची गरज आहे. कामाचे वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार ही कामे केली पाहिजे. कालबध्द पद्धतीने हे सर्व काम झाले तर येत्या दोन वर्षांत विमानतळाची धावपट्टी २३०० मीटरपर्यंत विस्तारली जाईल.

अपुऱ्या धावपट्टीमुळे विकासाला मर्यादा

सध्याच्या धावपट्टीवर एटीआर विमाने (७० ते ८० आसन क्षमता) उतरतात. १५० ते २०० अशा आसन क्षमतेची एअर बससारखी विमाने उतरण्यासाठी २३०० मीटरपर्यंतची धावपट्टी आवश्यक आहे. मोठी विमाने नसल्याने कोल्हापूर-दिल्लीसारख्या लांब पल्ल्याची विमानसेवा सुरू होत नाही. सध्या अपुऱ्या धावपट्टीमुळे विमानसेवेच्या विकासाला मर्यादा येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT