दर्शन वडेर
नृसिंहवाडी : कृष्णा-पंचगंगेच्या काठावर वसलेला कोल्हापूर जिल्हा दूध-दुभत्याने समृद्ध आहे. त्यामुळेच दुग्धजन्य पदार्थांची येथे नेहमी रेलचेल असते. यात नृसिंहवाडीच्या प्रसिद्ध बासुंदीला सर्वाधिक मागणी आहे. खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या या बासुंदीला एक प्रकारची वेगळी चव आहे. याचीच दखल घेऊन जीआय टॅग (भौगोलिक मानांकन) मिळवण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
नृसिंहवाडी परिसरातून 100 हून अधिक उत्पादक बासुंदी तयार करतात. विविध जिल्ह्यांत व परराज्यात सुमारे 50 वितरकांतर्फे ही बासुंदी ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. तसेच नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित परदेशात असणारे कोल्हापूरकर बासुंदीची चव सर्वत्र पोहोचवत आहेत. या बासुंदीला मोठी मागणी असल्याने नृसिंहवाडीची बासुंदी या नावाने निकृष्ट दर्जाची बासुंदी विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच नृसिंहवाडीच्या बासुंदीला जीआय टॅग मिळाल्यास असे प्रकार रोखता येणार आहेत.
ही बाब ओळखून गीता एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशनतर्फे नृसिंहवाडीतील बासुंदी उत्पादकांनी चेन्नई येथील भारत सरकारच्या केंद्रीय भौगोलिक मानांकन विभागाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. या विभागाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी प्रस्तावाचा औपचारिक तपासणी अहवाल मागवला होता. पुण्यातील पेटंटतज्ज्ञ अॅड. गणेश हिंगमिरे यांनी नृसिंहवाडीच्या बासुंदीची सविस्तर माहिती व कागदपत्रांद्वारे हा अहवाल 30 जानेवारीला सादर केला आहे.
नृसिंहवाडीच्या बासुंदीला एक वेगळी चव आणि दर्जा आहे. तसेच या उत्पादनाला धार्मिक अधिष्ठानाची जोड असल्याने खवय्ये बासुंदीची मोठी मागणी करतात. नृसिंहवाडीच्या बासुंदीला जीआय मानांकन मिळणे गरजेचे असून यामुळे कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत मानाचा तुरा खोवला जाणार आहे.संदीप जिरगे, बासुंदी उत्पादक