विशाळगड : विशाळगडाच्या 'त्या' घटनेला तब्बल तीन महिने झाले. गडावर अद्याप शुकशुकाट आहे. गड पायथा, केंबुर्णेवाडी येथील पोलिसांचा खडा पहारा बाहेरच्या व्यक्तीसह ग्रामस्थांना त्रासदायक ठरत आहे. गडावरील सर्वच व्यवहार बंद असल्याने गडवासीयांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. काही कुटुंबांनी या परिस्थितीत गड सोडला आहे. जनजीवन कधी पूर्वपदावर येणार? अशी माफक अपेक्षा रहिवाशांची आहे.
विशाळगडाच्या पायथ्याला व केंबुर्णेवाडीच्या चौकीत तीन महिने सलग २४ तास ड्युटी आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेले प्रकरण, त्याचे उमटलेले पडसाद यामुळे येथे कडक पोलीस बंदोबस्त आहे. कसून चौकशी करूनच गजापूर, मुसलमानवाडी, विशाळगड येथे पाठवले जात आहे. एसटी बंद होत्या. आता दिवसांतून दोन वेळा धावत असल्या तरी, एसटीतील प्रवाशांची तपासणी करूनच गडाकडे बसेस सोडल्या जात आहेत. गडावर बाहेरचा एकही माणूस जात नसल्यामुळे व्यावसायिक, सर्वसामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. संचारबंदीची झळ काय असते, हे विशाळगडावरचे हिंदू-मुस्लिम बांधव तसेच गडावर रोजगारासाठी येणाऱ्या आसपासच्या गावातील लोक अनुभवत आहेत.
गडावरील हिंदू-मुस्लिम बांधव गड सोडून बाहेर जात आहे. संसाराचा गाडा हाकायचा कसा? या विवंचनेने येथील भोसलेवाडीतील ९५ टक्के कुटुंबे गड सोडून बाहेर गावी गेली आहेत. त्यामुळे भोसलेवाडीत निरव शांतता आहे. काही कुटुंबे गडावरील जीवन पूर्वपदावर येईल, या आशेत आहेत. केंबुर्णेवाडीत सध्या पोलिसांच्या निवासाची सोय करून कडक बंदोबस्त ठेवला आहे. गड परिसरात सर्वत्र शुकशुकाट आहे. विशाळगडावरील जनजीवन पूर्वपदावर नाही, हे कर्नाटकातील भाविकांना माहीत नाही. त्यामुळे रोज चार-पाच गाड्या येतातच. पण केंबुर्णेवाडी चौकीवरुच माघारी फिरतात. विशाळगडाची ती घटना, त्या घटनेला मिळालेले काही निमित्त, त्यानंतरचा संताप हा साराच प्रकार वाईट होता. त्यात नेमके काय घडले?, कशामुळे घडले? कोण दोषी? कोण निर्दोष? हे स्पष्ट होईलच, पण सर्वसामान्य रहिवाशांचे काय?.
गेली तीन महिने बंदोबस्ताच्या निमित्ताने पोलीस एक वेगळीच 'अनुभवाची सजा' भोगत आहे. कोण चुकून गडावरती गेला तर काय? त्यानंतर आपले काय? या चिंतेतही पोलीस आहेत. गडावर भयाण शांतता आहे. बेकायदेशीर बांधकामे पाडली आहेत, त्याचे ढिगारे तेथेच जशेच्या तसेच आहेत. अनेकजण आलेत सांत्वन करून गेलेत, काहींना मदत मिळाली. पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. काही निर्बंध घालून का होईना, पूर्ववत सुरू व्हावे. गड, किल्ला पर्यटन निमित्ताने गडावर माणसांची वर्दळ, वहिवाट सुरू व्हावी, अशी माफक अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.