कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या फायर ऑडिटमध्ये (अग्निसुरक्षा) असलेल्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात याबाबत महापालिका प्रशासनाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अधिकृत नोटीसपत्र देऊन तीन महिने उलटले, तरी अद्याप देवस्थान व्यवस्थापनाने यासंदर्भात ठोस कार्यवाही केलेली नाही.
महापालिकेने दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर केवळ पाहणी, तपासणीवरच देवस्थानने या गंभीर विषयाची बोळवण केली असून आराखडा तयार करणे, आपत्कालीन मार्गाचा नकाशा बनवणे, फायरलोडचा अहवाल तयार करणे यासह अन्य त्रुटी अद्याप ‘जैसे थे’ आहेत. येत्या महिनाभरात श्रावणापासून भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरू होणार असल्याने अंबाबाई मंदिरातील अग्निसुरक्षेतील त्रुटी सुधारणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंदिरातील फायर सेफ्टी धोक्यात आहे. मंदिर आवारात आग लागली, तर अग्निसुरक्षा सक्षम नसल्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागातील तज्ज्ञांमार्फत मंदिराची पाहणी करून अग्निसुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची नोटीस मार्च 2025 बजावली होती; मात्र तीन महिन्यांनंतरही देवस्थान व्यवस्थापन आपत्कालीन आराखडा, नकाशाबाबत चर्चेपलीकडे गेलेले नाही.
आग लागल्यास अग्निशमन बंब मंदिरात प्रवेश करू शकत नसल्याने जोड पाईपलाईन यंत्रणा बसवा, आपत्कालीन काळात बचावकार्याला मार्गदर्शन करणारा आराखडा तयार करा, विद्युत लोड अपुरा पडल्यास पर्यायी व्यवस्था करा, पाण्याचे प्रेशर पंप अग्निसुरक्षा यंत्रणेला जोडून होज रिल्स बसवावे, मंदिर आवारातील दुकानांमधील ज्वालाग्राही मालाचा अहवाल करा, मंदिरातील विद्युत कक्ष सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा, मंदिरात ठिकठिकाणी फायर इन्स्टिम्युटेर कार्यान्वित करा.
अंबाबाई मंदिरातील अग्निसुरक्षेतील त्रुटी सांगून त्या तत्काळ सुधारण्याबाबत देवस्थानला नोटीस दिली आहे. देवस्थानकडून आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे; मात्र फायर ऑडिटमधील त्रुटी दुरुस्ती केल्याचा अहवाल देवस्थानने महापालिकेला सादर केलेला नाही.मनीष रणभिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका
अंबाबाई मंदिरातील अग्निसुरक्षेबाबत महापालिकेने दर्शविलेल्या त्रुटी लवकरच दूर केल्या जातील. काही त्रुटी दूर करण्याबाबत काम सुरू आहे. संबंधित विभागाकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला जाईल.शिवराज नाईकवाडे, सचिव, देवस्थान समिती