कोल्हापूरसह कोकणात धुडगूस घालणार्‍या हत्तींचा बंदोबस्त कधी? Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूरसह कोकणात धुडगूस घालणार्‍या हत्तींचा बंदोबस्त कधी?

टस्करांच्या उपद्रवामुळे सीमाभागांसह सिंधुदुर्गचे नागरिक भीतीच्या छायेत; 23 वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नांदणी येथील प्रसिद्ध जैन मठाच्या महादेवी या हत्तीणीला गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष केंद्रात पाठविण्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या भावनिक उद्रेकाच्या अंकाची सोमवारी सायंकाळी समाप्ती झाली. हजारो नागरिकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणार्‍या या हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाने वनतारा केंद्रात पाठविण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यावर शिक्कामोर्तब केले.

हत्तीणीच्या प्रेमापोटी जाज्वल्य लोकभावनेचे दर्शन एका बाजूला घडत असताना दुसर्‍या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांसह सीमाभागातील गावांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये कर्नाटकातून येणार्‍या हत्तींच्या उपद्रवामुळे एक टोकाची लोकभावना तयार झाली आहे.

या भागात हत्तींच्या कळपांनी गेली 2 दशकांहून अधिक काळ धुडगूस घातला आहे. पिकांची नासधूस करण्याबरोबरच शेतकर्‍यांचे बळी घेेणार्‍या हत्तीच्या कळपांना रोखण्याची मोहीम अपयशी ठरली आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तीग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी हत्तींच्या रवानगीविषयी कडक निर्देश देण्याची गरज आहे. कारण यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या पिकांची नुकसानी तर होत आहेच, भीतीने थरकाप उडाल्याने नागरिकांना स्वत:ला घरात कोंडून घ्यावे लागते आहे. त्याहीपेक्षा निष्पाप नागरिकांचे बळीही जात आहेत.

काही काळापूर्वी हिंदूंच्या उत्सवामध्ये गजराज अग्रभागी असायचा. परंतु, मानवाप्रमाणे प्राण्यांच्या जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न जसा वन्यजीव प्रेमींनी उपस्थित केला तसे सर्कशीतून हत्ती गायब झालाच परंतु, पाळीव हत्तींच्या सार्वजनिक वापरावर आणि वावरावर कायद्याने बंदी घालण्यात आली. नांदणीच्या महादेवीचा मिरवणुकीतील सहभाग असाच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘पेटा’ या संघटनेच्या निदर्शनास आला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने याविषयी समिती नियुक्त केली होती. समितीने महादेवीची तपासणी करून न्यायालयाला आपला अहवाल सादर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीची रवानगी वनताराकडे करण्याचा निकाल दिला. त्यानंतर कायदा विरुद्ध लोकभावना असा संघर्ष निर्माण झाल्याने प्रकरण सर्वोच्च्य न्यायालयात गेले. तेथेही निवाडा लोकभावनेच्या विरोधात गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती; पण जीनसेन भट्टारक स्वामींनी कायद्याची बूज राखली. नागरिकांना शांत केले.

आता प्रश्न उरतो ज्या परिसरामध्ये जंगली हत्तींच्या विरोधात लोकभावना तीव्र आहे त्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घालणार्‍या हत्तींच्या कळपांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी न्यायालय शासनाला कोणता निर्देश देणार?

हत्ती हा प्राणी एक आणि टोकाच्या लोकभावना हे द़ृष्य कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा पाहिले आहे. पहिल्या प्रकरणामध्ये महादेवीप्रकरणी लोकभावनेला दूर करून कायद्याची अंमलबजावणी झाली, पण दुसर्‍या प्रकरणामध्ये लोकभावना तीव्र असताना, हत्तीच्या उपद्रवापायी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी नुकसानभरपाईपोटी खर्ची पडत असताना शासन कोणताही ठोस निर्णय घेत नाही आणि न्यायालयही ‘सुमोटो’ खटला दाखल करून शासनाला निर्देश देत नाही. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अशा सहा तालुक्यातील नागरिकांचे जिणे असह्य झाले आहे. हत्तींच्या भीतीच्या छायेखाली संबंधित भागातील नागरिकांनी किती वर्षे काढावीत?, असा प्रश्न आजही सतावत आहे.

दोन कळपांचा धुमाकूळ

मुळातच दांडेलीच्या अभयारण्यात 65 हत्ती आहेत. यातील 5-6 हत्तींचे दोन कळप सीमेवर धुमाकूळ घालताहेत. त्यांना आवरण्यासाठी जर महादेवीच्या रवानगीसाठी ज्या जलदगतीने न्यायालय हलले त्या गतीने या प्रश्नालाही ऐरणीवर घेतले तर हत्तीच्या उपद्रवामुळे जीव मुठीत धरून बसलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

23 वर्षे उपद्रव आणि भीतीची छाया

गेली 23 वर्षे हत्तींचे कळप दांडेलीच्या जंगलातून महाराष्ट्राच्या हद्दीत घुसतात. ऊस, केळीच्या बागा, यासह अन्य पिके, वस्त्यांवरील घरे यांची प्रचंड नासधूस करतात आणि प्रसंगी निष्पापांना आपल्या पायाखालीही तुडवतात. पिढ्या पुढे निघाल्या तरी उपद्रव सुरू आहे. यासाठी ‘हत्ती गो बॅक’, सीमेवर चर खणणे, हत्तींच्या मार्गावर दोरखंडाना डिझेल आणि मिरची पूड बांधण्याचे उपायही झाले. पण बुद्धिमान हत्ती या सर्वांना निष्प्रभ ठरवून सतत नुकसान करतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT