कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील १५८ एकर जागेवरील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची सुपारी फुटल्याची चर्चा व्हॉटस् ॲपवर व्हायरल झालेल्या संदेशाद्वारे गुरुवारी (दि. ९) सुरू होती. दोन ते चार एजंट कार्यरत असून बांधकाम नियमित करून देण्याच्या नावाखाली संबंधित सुमारे दहा कोटी रुपयांची वसुली केल्याचे व्हायरल संदेशात म्हटले आहे.
नो डेव्हलपमेंट झोन तसेच न्यायालयाच्या अवमान याचिकेशी संबंधित बांधकामांसाठी प्रतिचौरस फूट सुमारे ३०० रुपये, ब्ल्यू लाईन मधील बांधकामांसाठी ५०० ते १,००० रुपये, तर आरक्षित जागेवरील बांधकामांसाठी १,००० ते १,५०० रुपये प्रतिचौरस फूट दर आकारले जात असल्याची चर्चा आहे. या कथित व्यवहारामागे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध कृती समिती आणि काही सामाजिक कार्यकर्ते घेत असल्याचे सांगण्यात आले. झोन बदलणे, ब्ल्यू लाईन हटविणे किंवा अन्य प्रशासकीय प्रक्रियेच्या माध्यमातून अतिक्रमणे नियमित करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
माणसं एवढी खुळी आहेत?
लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे. माणसं एवढी खुळी आहेत की कोणताही आदेश नसताना पैसे कसे देतोय एवढा थोडाफार विचार का केला जात नाही? हे एक प्रकारचे दुर्दैवच आहे. २१ व्या शतकातील एवढी माणसं खुळी असतील हे कोणाला पटले नव्हते, असेही व्हॉटस् ॲपवरील व्हायरल संदेशात म्हटले आहे.