उजळाईवाडी : गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अकाऊंट मॅनेजरची व्हॉटस्ॲप फसवणूक करून अज्ञात सायबर भामट्याने कंपनीचे तब्बल ८० लाख ५० हजार रुपये दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे वर्ग करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध प्रशांत रवींद्र पाटील (४५, रा. तुळजाभवानी नगर, उजळाईवाडी कोल्हापूर) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ तपासाला सुरुवात केली. ज्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे, ती खाती सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सायबर विभागाचे पोलिस निरीक्षक संजय हारुगडे तपास करत आहेत.
अशी झाली फसवणूक
प्रशांत पाटील हे युनिटी मोटर्स येथे अकाऊंट मॅनेजर आहेत. अज्ञाताने ९७५४००४५६२ या मोबाईल क्रमांकचा वापर करून पाटील यांचे व्हॉटस्ॲप अकाऊंट हॅक केले. त्यांच्या मोबाईलमध्ये ‘सीईओ गुरिंदर सर’ नावाने सेव्ह असलेल्या गुरिंदर सिंग यांच्या मोबाईल क्रमांकाचा डीपी व सेव्ह केलेले नाव वापरून स्वतःच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा बनाव करत व्हॉटस्ॲपद्वारे संदेश पाठवत तातडीने पैसे पाठविण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार प्रशांत पाटील यांनी येस बँक, गांधीनगर, गुजरात येथील खात्यावर ३२ लाख रुपये, तर सहारनपूर, उत्तर प्रदेश शाखेतील खात्यावर ४८ लाख ५० हजार रुपये असे एकूण ८० लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग केले.