कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या मोठमोठ्या संस्था आहेत. त्या संस्थात आ. सतेज पाटील यांनी कर्मचारी बसवले आहेत. त्या कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाद्वारे लोकांना मेसेज पाठवून बदनाम केले जाते. गोकुळच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविषयी मंत्री चंद्रकांत पाटील बोलले त्यात चुकीचे काय, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आ. सतेज पाटील यांनी सोशल मीडिया मॅनेज केला म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील खराब आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. पाटील व त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आव्हानाची भाषा करत असताना मंत्री चंद्रकांत पाटील बोलले तर ते चुकीचे कसे? मंत्री पाटील हे खरेच बोलले आहेत. सतेज पाटील हे गृह राज्यमंत्री असताना २०१३ मध्ये मी आमदार असतानाही माझ्यावर पोलिसांचा हल्ला झाला. त्यानंतर माझ्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी सतेज पाटील यांनी केले ते बरोबर आणि आता काही झाले तर ते चुकीचे कसे म्हणणार? काँग्रेसकडून राज्य सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आ. पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने हॉटेल बांधली आहेत. त्यांना सरकारी जागा एक रुपयाने दिली असताना ते डोनेशन कसे घेतात, असेही क्षीरसागर म्हणाले.
२०२९ मध्येही जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा महायुतीच जिंकेल
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहा आमदार महायुतीचे आहेत. मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने महायुतीवर जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद, महापालिकेवरही महायुतीची सत्ता आली आहे. २०२९ मध्येही विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीच जिंकेल. त्यामुळे काँग्रेसला आंदोलने करत बसण्याशिवाय काहीच काम उरलेले नाही, असा टोलाही आ. क्षीरसागर यांनी लगावला.